इस्लामाबाद – पाकिस्तानच्या संसदेत दाखल करण्यात आलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला तोंड न देता, पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. या सरकारने तशी शिफारस पाकिस्तानच्या राष्टपतींकडे करून पाकिस्तानात निवडणूका घेण्याची मागणी केली. यामुळे इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचून त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांना आणण्याचे विरोधी पक्षांची योजना फसली आहे. आपल्या विरोधात जाऊन परदेशी शक्तींच्या कारस्थानात सहभागी होण्यापेक्षा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधी पक्षांना दिले आहे.
पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील अविश्वास ठराव संमत होईल का, याची चर्चा भारतीय माध्यमांमध्येही सुरू होती. मात्र पाकिस्तानच्या संसदेचे सत्र सुरू झाले आणि कायदामंत्री फवाद चौधरी यांनी या अविश्वासदर्शक ठरावावरच प्रश्न उपस्थित केला. परकीय शक्तींनी कारस्थान करून इम्रान खान यांना सत्तेवरहून हटवण्यासाठी विरोधी पक्षांना हाताशी धरले व त्यातून हा ठराव समोर आला आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. त्यानंतर पाकिस्तानी संसदेचे उपसभापती कासिम सूरी यांनी नियमांचा हवाला देऊन हा ठराव रद्दबातल करण्याची घोषणा केली. पुढच्याच क्षणाला त्यांनी संसदेचे कामकाज तहकूब करून टाकले.
यामुळे इम्रान खान यांच्या सरकारला बहुमत सादर करावे लागले नाही. अन्यथा त्यांची रविवारीच पंतप्रधानपदावरून उचलबांगडी झाली असती. पण आता इम्रान खान निदान काही दिवस तरी आपले पंतप्रधानपद टिकविण्यात यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. त्याचवेळी आपल्या विरोधात आंतरराष्ट्रीय कट आखण्यात आल्याचा आरोप करून ते पाकिस्तानी जनतेची अधिकाधिक सहानुभूती मिळविण्याचा अधिक जोरदार प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. संसदेत सादर होणार्या या ठरावाच्या आधी इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना पाकिस्तानच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरून राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल होण्याचे आवाहन केले होते.
पाकिस्तानची जनता इम्रान खान यांच्या विरोधात गेली आहे. ज्या लष्कराने इम्रान खान यांची पंतप्रधानपदावर वर्णी लावले, ते लष्करच आता इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून खाली खेचण्याची तयारी करीत आहे. सध्या इम्रान खान यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी कैदेत ठेवण्यात आल्याचे दावे माध्यमे करीत आहेत. पंतप्रधानपदावर असले तरी त्यांचे सारे अधिकार काढून घेण्यात आले आहेत आणि ते कुठल्याही स्वरुपाची आगळीक करणार नाही, याची दक्षता पाकिस्तानच्या लष्कराकडून घेतली जात आहे. अशा परिस्थितीत इम्रान यांनी आपली गच्छंती टाळली असली, तरी पाकिस्तानसाठी ही बाब घातक ठरेल, असा इशारा पत्रकार व विश्लेषक देत आहेत.
इम्रान खान यांच्या धोरणांमुळे पाकिस्तानात बेदिली, अविश्वास आणि अराजक निर्माण झाले असून नजिकच्या काळात याचे परिणाम समोर येतील, अशी चिंता माध्यमे व्यक्त करीत आहे. युक्रेनचे युद्ध सुरू झाले, त्याच दिवशी इम्रान खान यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर अमेरिका व युरोपिय देश आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कट आखत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी सुरू केला आहे. विरोधी पक्ष या कटात सहभागी झाल्याचे सांगून इम्रान खान यांनी खळबळ माजविली. अमेरिकेने पाकिस्तानातील घडामोडींशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. तर पाकिस्तानच्या लष्करानेही राजकीय उलथापालथींशी आपला संबंध नसल्याचा खुलासा दिला आहे.
त्याचवेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी युक्रेनवर हल्ला चढविणार्या रशियावर टीका करून अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्याबरोबरच पाकिस्तानला अमेरिकेशी उत्तम संबंध अपेक्षित असल्याचा निर्वाळाही जनरल बाजवा यांनी दिला. अगदी भारतासोबतही पाकिस्ताला चांगले संबंध हवे असून आपल्या समस्या चर्चेद्वारे सोडवायच्या आहेत, असे जनरल बाजवा यांनी जाहीर केले. याआधीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताबाबत ही भूमिका जाहीर केली होती. पण पंतप्रधानपदावर असलेले इम्रान खान याला तयार नसल्याचा दावा जनरल बाजवा यांनी केला होता.