इस्लामाबाद – तीन महिन्यानंतर पाकिस्तानची अवस्था श्रीलंकेसारखी झाल्यावाचून राहणार नाही. कारण जेमतेम तीन महिने काढता येतील, इतकाच निधी पाकिस्तानच्या तिजोरीत उरलेला आहे, असा इशारा या देशाचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी दिला. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले असून सुमारे 20 लाख जणांना घेऊन राजधानी इस्लामाबादमध्ये धडक मारण्याची धमकी दिली. तर इम्रानखान पाकिस्तानचे तुकडे पाडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटाचा सामना करीत असताना, विरोधी पक्षनेते इम्रानखान निवडणुकीची मागणी करीत आहेत. सध्याचे पाकिस्तानचे सरकार अमेरिकेने नियुक्त केलेले असून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारच नसल्याचे खान यांचे म्हणणे आहे. म्हणूनच 20 मे रोजी लाँग मार्च घेऊन आपण राजधानी इस्लामाबादमध्ये चालून जाऊ, अशी घोषणा इम्रानखान यांनी केली होती. याचे पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. निराश व वैफल्यग्रस्त बनलेल्या तरुणवर्गात इम्रान खान जहरी विचार पेरत आहेत. त्याचे भयंकर परिणाम होतील. पंतप्रधानपदावर असताना इम्रानखान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची दैना उडविली. आता ते पाकिस्तानात नागरी युद्ध पेटवून पाकिस्तानचे तुकडे पाडण्याची तयारी करीत आहेत, अशी जळजळीत टीका पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली.
इम्रान खान यांना आत्ताच रोखले नाही, तर पाकिस्तान म्हणजे उद्ध्वस्थ झालेल्या सिरिया आणि लिबियाचे हिडिस प्रतिबिंब बनेल, अशी गंभीर चिंता पंतप्रधान शरीफ यांनी व्यक्त केली. इम्रानखान यांना या विघातक कारवायांचा जाब द्यावा लागेल व त्यांच्यावर कारवाई होईल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बजावले आहे. मात्र आपल्याला अटक झाल्यास पाकिस्तानात हाहाकार माजेल, असा इशारा इम्रान खान यांनी दिला. इतकेच नाही तर 20 मे रोजीचा आपला लाँग मार्च कुणीही अडवू शकणार नाही, असे सांगून त्यांनी पाकिस्तानच्या सरकारला आव्हान दिले आहे.
20 मे रोजी 20 लाख पाकिस्तानी देशाच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल होतील. आमच्या मार्गात कितीही अडथळे आणले तरी त्याने फरक पडणार नाही, असे इम्रानखान पुढे म्हणाले. त्याचवेळी या लढ्यात आपण तटस्थ असल्याचे दावे करणारे असत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. अशा लढात केवळ जनावरेच तटस्थ राहू शकतात, अशी शेरेबाजी करून इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष्य केले.
कुठल्याही परिस्थितीत इम्रान खान यांना हातून गेलेली सत्ता परत मिळवायची आहे. त्यासाठी पाकिस्तानची वाताहत झाली, तरी त्यांना त्याची पर्वा राहिलेली नाही, अशी टीका माध्यमे करीत आहेत. इतकेच नाही तर इम्रानखान यांचा मानसिक तोल ढासळल्याचे दावेही काही पत्रकारांनी केले आहेत. अहंगंडाने पछाडलेले इम्रान खान आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी पाकिस्तानचे भवितव्य पणाला लावत असल्याचा आरोप जोर पकडत आहेत. तरीही इम्रानखान यांना पाकिस्तानच्या तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आत्तापर्यंत लष्कराने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. गृहयुद्ध टाळण्यासाठी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी संयम दाखविलेल आहे खरा. पण लवकरच त्यांना इम्रानखान यांचा बंदोबस्त करावाच लागेल, असे काही विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.