दीड वर्षात अधिक प्रमाणात ‘उडत्या तबकड्या’ दिसल्या

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अहवाल

flying saucersवॉशिंग्टन – गेल्या काही वर्षात अमेरिकेत उडत्या तबकड्यांशी संबंधित 500हून अधिक घटनांची नोंद झाल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली. काही घटना ड्रोन्स व बलून्सच्या असल्या तरी अनेक घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचे ठोस स्पष्टीकरण देता आलेले नाही, असे संरक्षण विभागाच्या नव्या अहवालात सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांशी संबंधित माहिती मोठ्या प्रमाणात समोर येत असून अमेरिकेच्या संसदेने यासाठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेचा संरक्षण विभाग परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांशी संबंधित घटनांची माहिती गोळा करीत आहे. मात्र ही माहिती सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. 2017 व 2018 साली अमेरिकेतील प्रसारमाध्यमे तसेच काही खाजगी गटांनी परग्रहवासियांच्या तबकड्यांचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागालाही यासंदर्भात कबुली देणे भाग पडले. 2019 साली अमेरिकेच्या नौदलाने माध्यमांकडून प्रसिद्ध होणारे व्हिडिओ तसेच माहिती खरी असल्याचे जाहीर केले.

'flying saucers' were seenत्यानंतर अमेरिकेच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सिनेटर मार्को रुबिओ यांच्यासह अनेकांनी सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संसदेच्या निर्देशांनुसार, अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’ व संरक्षण विभागाने स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना केली होती. 2021 साली स्थापन करण्यात आलेल्या या टास्क फोर्सने उडत्या तबकड्यांशी संबंधित एकूण 510 घटनांची नोंद झाल्याची माहिती दिली.

यातील 366 घटना पूर्णपणे नव्या असून त्यात जून 2021 नंतरच्या 247 घटनांचा समावेश आहे. यातील 171 घटनांची नोंद ‘कोणतेही स्पष्टीकरण नसलेल्या’ अशा शीर्षकाखाली करण्यात आली आहे. या घटनांचे अधिक विश्लेषण आवश्यक असल्याचा निष्कर्ष संरक्षण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे. बहुतांश घटना अमेरिकी हवाईदल व नौदलाकडून सांगण्यात आल्याचेही म्हटले आहे. यापूर्वी विविध अधिकारी व गटांकडून देण्यात आलेल्या माहितीत, उडत्या तबकड्यांपासून अमेरिकेच्या अणुकार्यक्रमासह राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे बजावण्यात आले होते.

leave a reply