बाल्टिमो – कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील बळींची संख्या ३,७१,०१६ वर गेली आहे. तर ६१ लाखाहून अधिक जणांना या साथीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी २७ लाख रुग्ण या आजारातून बरे झाल्याची दिलासादायक बाब ठरते. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाव्हायरसमुळे ४,१०० जणांचा बळी गेला आहे. सलग चौथ्या दिवशी जगभरातील बळींची संख्या कमी झाल्याची नोंद जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने केली आहे. अमेरिकेत या साथीने ९६० जण दगावले असून या देशात कोरोनाने दगावणाऱ्यांची एकूण संख्या १,०३,००० च्या पुढे गेली आहे. तर ब्राझीलमध्ये ९५६ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये या साथीने दगावणाऱ्यांची एकूण संख्या २८,८३४ वर पोहोचली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत ब्राझीलमध्ये या साथीचे ३३,२७४ नवे रुग्ण आढळले असून एकाच दिवसात कुठल्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्याची ही पहिलीच घटना ठरते. ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी फुटबॉल लीग सुरू करण्याचे जाहीर केले आहे तर या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराचे सहाय्य घेण्याची घोषणा केली आहे. बोल्सोनरो यांच्या चुकीच्या धोरणामूळे ही साथ झपाट्याने फैलावत असल्याचा आरोप करुन यासाठी ब्राझिलचे विरोधी पक्ष व माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनरो यांना धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर बोल्सोनारो सरकारच्या चार मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.
लॅटिन अमेरिका या साथीचे नवे केंद्र ठरले असून या क्षेत्रात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या ५० हजारांच्या वर गेली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या जवळ पोहोचली असून एकट्या ब्राझीलमध्ये सुमारे चार लाख या साथीचे रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. लॅटिन अमेरिकी देशांपैकी ब्राझील, चिली, मेक्सिको आणि पेरू या देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत.