पॅरिस – फ्रान्समध्ये कोरोनाची पाचवी लाट आली असून या नव्या लाटेत रुग्णांची संख्या वीजेच्या वेगाने वाढत असल्याचा इशारा सरकारी प्रवक्ते गॅब्रिएल ऍटल यांनी दिला. अवघ्या एका आठवड्यात फ्रान्समधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१ टक्क्यांची वाढ झाल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. रविवारी फ्रान्समध्ये सुमारे २० हजार रुग्णांची भर पडल्याचे समोर आले आहे.
युरोपातील बहुतांश देशांमध्ये पुन्हा कोरोना साथीची व्याप्ती भयावहरित्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक देशांमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतरची विक्रमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली असून त्यातही सातत्याने भर पडत आहे. या लाटेत जवळपास तीन लाखांहून अधिक जणांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा नुकताच देण्यात आला होता. फ्रेंच प्रवक्त्यांचे वक्तव्यही त्याला दुजोरा देणारे ठरते.
फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाच्या ७५ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे दगावणार्यांची संख्या १.१९ लाखांवर गेली आहे. फ्रान्समध्ये दर आठवड्याला रुग्णांमध्ये भर पडत असून ही बाब चिंताजनक ठरते असे गॅब्रिएल ऍटल यांनी बजावले. गेल्या आठवड्यात फ्रान्समध्ये सरासरी १७,१५३ रुग्णांची नोंद झाली होती. त्याआधीच्या आठवड्यात ही आकडेवारी १० हजारांच्याही खाली होती.