उत्तम संबंध ठेवण्यातच भारत व चीनचे हित

-चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे समजुतीचे बोल

सिंगापूर – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांवर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. सिंगापूर येथील शांग्री-ला परिषदेत बोलताना अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताचे लष्करी सामर्थ्य ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समतोल कायम राखणारी शक्ती असल्याचाही दावा केला होत्या. त्यानंतर या परिषदेतच बोलताना चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी भारत व चीनचे संबंध सुरळीत राहण्यातच दोन्ही देशांचे हित सामावलेले असल्याचे समजुतीचे बोल ऐकवले आहेत.

India-Chinaशांग्री-ला परिषदेत पार पडलेल्या एका कार्यक्रमात विचारण्यातआलेल्या प्रश्नालाउत्तर देताना चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताबरोरील चांगल्या संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. भारत व चीन शेजारी देश आहेत. दोन्ही देशांचे संबंध सुरळीत राहण्यात उभय देशांचे हित समावलेले आहे. लडाखच्याएलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्येआत्तापर्यंत चर्चेच्या 15 फेऱ्या पार पडल्या आहेत. पुढच्या काळातही चर्चेद्वारे ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून चीन भारताबरोबरील सीमावादाची तीव्रता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर येऊ नये, यासाठी धडपडत आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर शांग्री-ला परिषदेत चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी देखील त्याच धर्तीवर दावे करून सीमावादाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या आधी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी लडाखच्या एलएसीवरील चीनच्या कारवाया चिंताजनक असल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. इतकेच नाही तर भविष्यात चीनने भारताच्या विरोधात आगळीक केलीच, तर अमेरिका संपूर्णपणेभारताच्या मागे उभी असेल, असे आश्वासन यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले होते.

त्यानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी लडाखच्या एलएसीवरील तणावावर काढलेले हे समजुतीचे बोल लक्षणीय ठरतात. चीन सीमावाद सामोपचाराने सोडविण्यात आपल्याला स्वारस्य असल्याचे वरकरणी दाखवित असला तरी प्रत्यक्षात एलएसीवरील चीनच्या हालचाली निराळेच संकेत देत आहेत. एलएसीजवळील आपल्या क्षेत्रात चीन मोठ्या प्रमाणात लष्करी बांधकाम करी आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेही याची दखल घेतली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या हालचालींकडे भारताची नजर रोखलेली आहे, असे बजावले होते. त्याचवेळी चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी भारत योग्य ती पावले उचलत असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. मात्र चीन त्यावर जहाल प्रतिक्रिया न देता, सौम्य भाषेचा प्रयोग करीत आहे. आधीच्या काळात भारताच्या विरोधात चीनने अशा स्वरुपाचा संयम दाखविलेला नव्हता. उलट लडाखमधील एलएसीचा वाद पेटलेला असताना, चीनने अधिकृत पातळीवर भारताला 1962 सालच्या युद्धातील पराभवाची आठवण करून दिली होती. तर भारत आपल्या देशाच्या लष्करी सामर्थ्यासमोर टिकाव धरू शकणार नाही, असे दावे चीनची सरकारी माध्यमे वारंवार करीत होती.

या पार्श्वभूमीवर, चीनने भारताच्या विरोधात कठोर भाषेचा प्रयोग सोडून समजुतीची भूमिका स्वीकरणे या आक्रमक देशाच्या परंपरेत बसणारे नाही. मात्र राजनैतिक पातळीवर चीन आक्रमक भाषा वापरत नसला, तरी लडाखच्या एलएसीवर चीनच्या कारवाया भारताचा संशय वाढवित आहेत. याविरोधात भारताचे संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्री आणि लष्करप्रमुखही चीनला नेमक्या शब्दात इशारे देत आहेत. काहीही झाले तरी एलएसीवर एकतर्फी कारवाई करून इथली यथास्थिती बदलण्याची परवानगी चीनला देता येणार नाही, हा इशारा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकताच दिला होता.

leave a reply