मुंबई – शुक्रवारी राज्यात पुन्हा एकदा चोवीस तासात २५ हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच ६० जणांचा बळी गेला आहे. मुंबईत एका दिवसात या साथीच्या तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरामध्ये निर्बंधात वाढ केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली. यानुसार पुन्हा एकदा कार्यालयांमधून ५० टक्के कर्मचार्यांची उपस्थिती असावी, अशा सूचना देण्यात आल्या. मुंबई महापालिकेने मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. ‘लॉकडाऊन’ हा शेवटचा पर्याय असून नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील ६० टक्क्याहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती या मंडळामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असतानाही राज्यात चोवीस तासात जेवढे रुग्ण आढळत नव्हते, त्याहून जास्त रुग्ण आता आढळून येत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. जास्त वेगाने पसरणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन याला जबाबदार आहे का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळेच कंेंद्र सरकारने राज्याला कोरोनाच्या म्यूटेटेड विषाणूचा माग काढण्यासाठी जिनोम टेस्टिंगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारने अद्याप कोरोनाचा नवा स्ट्रेन रुग्ण वाढीमागे असल्याचे स्पष्ट झालेले नाही, असे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी नाशिकमध्ये दुबई, युरोपातील नवा कोरोना स्ट्रेन आढळल्याच्या बातम्या आहेत. हा स्ट्रेन ६० टक्के अधिक वेगाने पसरतो, असा दावा करण्यात येत आहे. नाशिकमध्ये पाच वेगवेगळे स्ट्रेन आढळत आहेत, असे वृत्त आहे. पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ने तसेच एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खाजगी प्रयोगशाळेने याची पुष्टी केल्याचे सांगण्यात येते. मात्र राज्य सरकारने अजून याबाबत माहिती दिलेली नाही. दरम्यान, काही जिल्ह्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात लॉकडाऊन, नाईट कर्फ्युसारखे निर्णय घेतले होते. आता राज्य कोरोना रुग्ण विक्रमी पातळीवर वाढल्यानंतर सरकारने राज्यभरासाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. बंदिस्त जागेत धार्मिक, सामाजिक, राजकीय बंदी टाकली आहे. अत्यावश्यक सुविधा, उत्पादन क्षेत्र वगळता ५० टक्के उपस्थितीचा नियम करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने मॉलमध्ये प्रवेशासाठीही कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. तसेच मॉलमध्ये येणार्यांकडे तसा अहवाल नसेल, तर प्रवेशाआधी अँटिजेन चाचणी करून घ्यावी लागेल, असे स्पष्ट बजावले आहे.