मॉस्को/वॉशिंग्टन – आपल्या अंगभूत सामर्थ्याच्या बळावर जगात विधायक भूमिका पार पाडण्याचा जन्मसिद्ध अधिकार भारताला लाभलेला आहे, असे सांगून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताला 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत व अमेरिका एकमेकांचे न बदलता येण्याजोगे भागीदार असल्याचा दावा करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने केलेली प्रगती कौतूकास्पद ठरते. भारताची रशियाबरोबर धोरणात्मक भागीदारी असून ही भागीदारी अधिकाधिक विकसित होत आहे. दोन्ही देश विविध क्षेत्रात प्रभावीरित्या सहकार्य करीत आहेत, असे सांगून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ भारत व रशियासाठीच नाही तर क्षेत्रिय तसेच जागतिक सुरक्षा आणि स्थैर्य भक्कम करण्यासाठी सहाय्यक ठरेल, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी व्यक्त केला.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी भारताच्या लोकशाहीची प्रशंसा करून भारत व अमेरिका हे लोकशाहीवादी देश आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहेत, असा दावा केला. तसेच मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारत व अमेरिका एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले.
अमेरिकेत सुमारे 40 लाख भारतीय असून हे इंडियन अमेरिकन भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत, याकडेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. भारत व अमेरिकेमधील संबंध अधिक दृढ होण्यामागे दोन्ही देशांमधील जनतेचे घट्टपणे जोडलेल्या नात्याचा आधार आहे, असेही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.