पाच वर्षात भारत 475 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करील

- सीआयआय-ईवायच्या अहवालाचा निष्कर्ष

गुंतवणूक आकर्षितनवी दिल्ली – पुढच्या पाच वर्षात भारत सुमारे 475 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करू शकेल, असा निष्कर्ष सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) व ‘ईवाय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदविण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देखील भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर विशेष परिणाम झालेला नाही. भारताकडे असलेली फार मोठी ग्राहकशक्ती, भारत सरकारने हाती घेतलेल्या सुधारणा व डिजिटायझेशनला भारतात मिळालेली चालना, यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारताच्या क्षमतेची जाणीव झालेली आहे. म्हणूनच भारतात येणारी परकीय गुंतवणूक पुढच्या काळात वाढत जाईल, असा विश्वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

‘व्हिजन डेव्हलप इंडिया अपॉच्युर्निटीज्‌‍ अँड एस्पेक्टेशन्स ऑफ एमएनसीज्‌‍’ असे शीर्षक असलेल्या या सीआयआय व ईवायच्या अहवालात भारतात आलेल्या व पुढच्या पाच वर्षात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीवर अभ्यास करण्यात आला आहे. 2021-22 या वित्तीय वर्षात भारतात आलेली थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) 84.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. या काळात कोरोनाच्या साथीचे संकट व भू-राजकीय तणावामुळे आर्थिक पातळीवर अस्थैर्य निर्माण झाले होते. पण अशा काळात देखील भारतात आलेली ही 84 अब्ज डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाली, ही लक्षणीय बाब ठरते, याकडे सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. दशकभरापासून भारतात येत असलेल्या परकीय गुंतवणुकीत वाढच होत चालली आहे. गेल्या पाच वर्षात तर याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे, याचीही नोंद सदर अहवालाने घेतली आहे.

जगभरातील सुमारे 71 टक्के इतक्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय वाढवायचा आहे. तर भारताच्या कामगिरीवर 96 टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यांनी समाधान व्यक्त केले आहे, असे हा अहवाल सांगतो. भारत सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला मिळत असलेली गती अशीच कायम राहिली तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीचे प्रमाणही वाढत जाईल. पुढच्या काळात भारताकडे प्रचंड प्रमाणात असलेली ग्राहकशक्ती, सेवाक्षेत्र, डिजिटल अर्थकारण, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्राची प्रगती, यावर भारताचा आर्थिक विकास आधारलेला असेल, असे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातील आपले उत्पादन व त्याच्याशी निगडीत पुरवठा साखळी भक्कम करण्यासाठी अधिक गुंतवणूक करतील, असा दावा सदर अहवालात करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक देखील भारताच्या आर्थिक कामगिरीवर आपला विश्वास व्यक्त करीत आहेत. तर 2028 सालापर्यंत जर्मनी व जपान या देशांना मागे टाकून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा दावा नाणेनिधी व जागितक बँकेच्या आकडेवारीवरून केला जातो.

leave a reply