भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात कठोर धोरण स्वीकारले

-परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले ही सर्वसाधारण बाब म्हणून खपवून घेता येणार नाही, असे कठोर धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले. याचा फार मोठा प्रभाव भारताच्या पाकिस्तानविषयकधोरणावर पडला, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात परराष्ट्रमंत्री बोलत होते. भारतात दहशतवादी हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तान पुन्हा जोरदार प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत असताना, परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली ही विधाने लक्षवेधी ठरत आहेत.

India-adopts-tough-policyजम्मू व काश्मीरसह पंजाबच्या सीमेवर पाकिस्तान ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचे अनेकवार उघड झाले हेोते. भारतीय लष्कराने जम्मू व काश्मीरमध्ये शेकडोंच्या संख्येने दहशतवाद्यांना ठार केले असून यामुळे इथे घातपात माजविणे पाकिस्तानसाठी अवघड बनत चालले आहे. यामुळे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयने जम्मू व काश्मीरमधील जनसामान्यांन लक्ष्य करण्याचे डावपेच आखले आहेत. त्याचवेळी जम्मू व काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी दबा धरून बसल्याचा इशारा भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पाकिस्तानच्या या चिथावणीखोर कारवाया सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळविण्यासाठी पाकिस्तानने भारताबरोबर वाटाघाटी सुरू करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानचे काही मंत्री भारताशी चर्चा सुरू केल्याखेरीज पर्याय नाही, असे दावे करून याची वातावरणनिर्मिती करीत आहेत. आत्ताच्या काळात भारताने पाकिस्तानशी चर्चा सुरू केली, तर त्याचा फार मोठा लाभ पाकिस्तानला मिळू शकतो, असा तर्क त्यामागे आहे. पण पाकिस्तानला हवी असेल त्यावेळी शांतता आणि पाकिस्तानला हवे असेल त्यावेळी युद्ध, अशारितीने पुढे जाता येणार नाही, असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी बजावले होते.

पाकिस्तानला अनुकूल असेल त्यावेळी चर्चा किंवा युद्ध करायला भारत तयार नाही. यासाठी वेळेची निवड भारतच करील, असा इशारा डोवल यांनी दिला होता. हा इशारा पाकिस्तानच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. डोवल यांच्या उद्गारांचा अर्थ, भारत पाकिस्तानवर चढाई करील, असा होत असल्याचे पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात दहशतवादी कारवाया सुरू ठेवूनही भारत आपल्याशी चर्चा करीत राहिल, या भ्रमात पाकिस्तानला राहता येणार नाही, याची जाणीव डोवल यांनी करून दिली होती. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नवी दिल्लीतील कार्यक्रमात काढलेले उद्गार भारताची ही भूमिका नव्याने मांडत आहेत.

leave a reply