नवी दिल्ली – भारताचा रुपया आणि सौदी अरेबियाचे चलन असलेल्या ‘रियाल’मध्ये व्यापार करण्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा पार पडली. याबरोबरच सौदीमध्ये भारताची पेमेंट सिस्टीम ‘युपीआय’ आणि ‘रूपी कार्ड’च्या वापरावरही दोन्ही देशांच्या व्यापारमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने दिली. भारताला इंधनाचा पुरवठा करणारा प्रमुख देश असलेल्या सौदीशी सुरू असलेल्या या चर्चेला यश मिळाल्या, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थितीगती पालटू शकते. त्यामुळे भारताचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांच्या या सौदी भेटीचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे भारताला रुपया-रूबलमध्ये व्यवहार करावा लागला होता. दोन्ही देशांमधील व्यवहारातून डॉलर वजा झाल्याने, त्याचा फार मोठा लाभ भारताला मिळाला. रशियापाठोपाठ इतर देश देखील भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी उत्सुक आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील रुपयामधील व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आवश्यक ती पावले देखील उचलली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच दिली होती. अशा परिस्थितीत इंडिया-सौदी अरेबियामधील व्यापारी चर्चेसाठी व्यापारमंत्री पियूष गोयल सौदीत दाखल झाले. 18 सप्टेेंबरपासून सुरू झालेला त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा लक्षणीय ठरतो आहे.
सौदी अरेबियाबरोबरील चर्चेत उभय देशांमधील व्यापार अधिक व्यापक व विस्तारित करण्याबरोबरच व्यापारात येणारे अडथळे दूर करण्यावर चर्चा झाली. भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राला सौदीत मान्यता व संधी देण्याच्या मुद्याचाही यात समावेश होता. मात्र रुपया व रियालमधील व्यवहार हा या चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. याबरोबरच पियूष गोयल यांची सौदीचे मंत्री अब्दुलाझिझ बिन सलमान अल सौद यांच्यात भारताची पेमेंट सिस्टीम युपीआय व रुपे कार्ड सौदीतही सुरू करण्यावर वाटाघाटी झाल्याची माहिती भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने दिली. इतकेच नाही तर दोन्ही देशांमधील व्यापारी सहकार्याला फार मोठी संधी असलेल्या 41 क्षेत्रांची निवड तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. कृषी क्षेत्र, अन्नसुरक्षा ऊर्जा, तंत्रज्ञान व आयटी, उद्योग व पायाभूत सुविधा क्षेत्रातील सहकार्य व्यापक करण्यावरही या बैठकीत सहमती झाली.
याबरोबरच भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर इंधन शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम, एलएनजीच्या संदर्भातील सुविधा आणि भारतात पेट्रोलियम उत्पादनाचे धोरणात्मक साठे करण्याबाबतच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण असताना, भारताच्या इंधन सुरक्षेला याचा फार मोठा लाभ मिळू शकेल. याबरोबरच दोन्ही देशांच्या उद्योगक्षेत्रातील मान्यवरांमध्ये झालेल्या बैठकीत भारताच्या सौदीमधील निर्यातीत तसेच सौदीच्या भारतातील गुंतवणुकीत वाढ करण्यावरही विचारविनिमय पार पडला.