चीनच्या घुसखोरीपासून भारत व अमेरिकेने सावध रहावे

अमेरिकेचे रिअर ॲडमिरल बेकर यांचा इशारा

नवी दिल्ली – भारताच्या उत्तरेकडील सीमेवर तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही चीनच्या कारवायांवर भारत आणि अमेरिकेने सावधपणे नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांना याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा अमेरिकेचे रिअर ॲडमिरल मायकल बेकर यांनी केला. याआधीही भारताने चीनपासून सावध रहावे, चीन कुठल्याही क्षणी उत्तरेकडील सीमेवर घुसखोरी करू शकतो, असे अमेरिका भारताला वारंवार बजावत आहे. भारतातील अमेरिकेच्या दूतावासात डिफेन्स अटॅचे म्हणून कार्यरत असलेल्या रिअर ॲडमिरल बेकर यांनी पुन्हा एकदा हा धोका अधोरेखित केला आहे. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर रशियाच्या विरोधात जाण्यास नकार देणाऱ्या भारताला, अमेरिकेच्या लष्करी सहकार्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी अमेरिका वारंवार असे इशारे देत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Rear_Admiral_Michael_L_Bakerभारताच्या उत्तरेकडील सीमेवर चीन पुन्हा एकदा घुसखोरी करू शकतो. हा धोका अजूनही टळलेला नाही. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया ही संवेदनशील बाब ठरते. त्यामुळे भारत व अमेरिका या दोन्ही सहकारी देशांना चीनच्या या कारवायांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावर भारत व अमेरिकेला अतिशय सावधपणे नजर ठेवावीच लागेल, असे रिअर ॲडमिरल बेकर यांनी म्हटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्र स्वतंत्र व मुक्त ठेवायचे असेल, तर या क्षेत्रातील देशांना भारत तसेच अमेरिकेसारख्या देशाबरोबर भागीदारी करावी लागेल. यामुळे हे क्षेत्र स्वतंत्र व मुक्त राहिल, असा दावा रिअर ॲडमिरल बेकर यांनी केला. त्याचवेळी भारताच्या रशियाबरोबरील घनिष्ठ सहकार्यावर बोलताना, अमेरिकेला भारताने स्वतःहून निवड केलेला भागीदार देश बनायचे आहे, असे स्पष्ट केले. शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्यासाठी बऱ्याच प्रमाणात रशियावर अवलंबून असलेल्या भारताने गेल्या काही वर्षांपासून या आघाडीवर वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे, याकडेही रिअर ॲडमिरल बेकर यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळले होते. त्यावर अमेरिकेने भारताला थेट इशारे दिले होते. पुढच्या काळात चीनने पुन्हा भारताच्या उत्तरेकडील सीमेवर घुसखोरी केली, तर चीनचा गुलाम असलेला रशिया काही भारताला वाचवण्यासाठी धावणार नाही. त्यावेळी अमेरिकाच भारताला सहाय्य करील, हे लक्षात घेऊन भारताने युक्रेनच्या संदर्भात भूमिका घ्यावी, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. याचे तीव्र पडसाद भारतातून उमटले होते. त्यानंतरच्या काळातही रशियाकडून इंधनाची खरेदी करणाऱ्या भारताला अमेरिकेने धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही चीनपासून भारताला संभवणाऱ्या धोक्याची जाणीव ठेवून भारताने निर्णय घ्यावे, असे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताला सुनावले होते.

पण अमेरिकेच्या या धमक्या व इशाऱ्यांचा भारताच्या धोरणावर परिणाम झालेला नाही. त्यामुळेच भारताला चीनकडून संभवणारा धोका टळलेला नाही, असे अमेरिकेचे अभ्यासगट, विश्लेषक आणि लष्करी अधिकारी तसेच नेते देखील सातत्याने सांगत आहेत. रिअर ॲडमिरल बेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यामागे ही पार्श्वभूमी आहे. मात्र चीनपासून भारताला संभवणाऱ्या धोक्याचा इशारा देताना, रिअर ॲडमिरल बेकर यांनी भारताकडे चीनला टक्कर देण्याची क्षमता असल्याचेही मान्य केले. अमेरिकी तसेच इतर देशांमधील विश्लेषकांनीही भारत चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ शकतो, असे सांगून भारताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. चीनला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर अमेरिकेसाठी भारताखेरीज दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भारताशी सामरिक भागीदारी विकसित करण्यासाठी अमेरिकेने अधिक आक्रमक प्रयत्न करायला हवे, असा सल्ला अमेरिकन लोकप्र्रतिनिधी व आजी-माजी लष्करी अधिकारीही देत आहेत.

leave a reply