जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

नवी दिल्ली – ‘जी-20′ परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची अमेरिका, रशिया, फ्रान्स व सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा पार पडली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबर जागतिक पातळीवरील आव्हानांवर मोकळ्या वातावरणात चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. तर भारत हा अमेरिकेचा ‘ग्रेट पार्टनर’ असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. अमेरिका भारताबरोबर रशिया-युक्रेन युद्धासह जगातील प्रत्येक समस्येवर चर्चा करीत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी दिली.

G-20-summitयुक्रेनचे युद्ध सुरू असतानाच, इंडोनेशियाची राजधानी बाली येथे ‘जी-20’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जयशंकर यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याशी चर्चा झाली होती. तर शुक्रवारी जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह, फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कोलोना, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबरील परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची चर्चा लक्षवेधी ठरली आहे.

जी-20 परिषदेत युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाच्या विरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न अमेरिका करणार असल्याचे या बैठकीच्या आधीच स्पष्ट झाले होते. युक्रेनच्या युद्धात कुणा एका देशाची बाजू घेणार नाही, अशी सातत्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या भारतावर नव्याने दडपण टाकण्याची संधी म्हणून अमेरिका या जी-20 परिषदेकडे पाहत असल्याचे उघड झाले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपला देश भारताकडे महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून पाहत असल्याचा ‘संदेश’ यावेळी दिला. तसेच युक्रेनमधील युद्धासह जगातील प्रत्येक समस्येवर अमेरिका भारताशी चर्चा करीत असल्याचेही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून भारताशी सुरू असलेला अमेरिकेचा संवाद पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे सूचक उद्गार परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी यावेळी काढले.

leave a reply