फ्रान्स, ब्रिटनलाही मागे टाकून भारत सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल

- ‘सीईबीआर’चा निष्कर्ष

सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्थालंडन – २०२२ साली फ्रान्सला मागे टाकून, तर २०२३ साली ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. ‘द सेंटर फॉर इकॉनामिक्स अँड बिझनेस रिसर्च-सीईबीआर’ या ब्रिटनच्या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्याचवेळी पुढच्या वर्षी ‘ग्लोबल इकॉनॉमिक आऊटपुट’ १०० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार असल्याची माहिती ‘सीईबीआर’ने दिली आहे.

कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या आर्थिक मरगळीचा फार मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला होता. पण आता भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळू लागली असून नजिकच्या काळात फ्रान्स तसेच ब्रिटनला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर येईल, असे ‘सीईबीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील भारतीय अर्थव्यवस्था झेप घेण्याच्या तयारीत असल्याचा अहवाल दिला होता. आर्थिक क्षेत्रात काम करणार्‍या इतर वित्तसंस्थांनीही याला दुजोरा दिला होता. याबरोबरच २०२२ सालात ‘ग्लोबल इकॉनॉमिक आऊटपुट’ १०० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार असल्याची माहिती ‘सीईबीआर’ने दिली आहे. पुढच्या सात वर्षात चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनेल, असे दावे केले जात होते. पण यासाठी चीनला आणखी काही वर्ष प्रतिक्षा करावी लागेल, असे ‘सीईबीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०३० साली चीन अमेरिकेच्या पुढे जाईल व जगातील अव्वल अर्थव्यवस्था बनेल, असा दावा सीईबीआरने केला आहे.

सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्थादरम्यान, २०२५ सालापर्यंत आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे ध्येय भारताने आपल्यासमोर ठेवले आहे. मात्र कोरोनाच्या साथीमुळे हे ध्येय गाठणे अवघड बनल्याचा दावा केला जातो. मात्र कोरोनाच्या साथीची दुसरी लाट ओसरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीत सुधारणेची नोंद झाली होती. आता भारतीय अर्थव्यवस्था झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे केेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. थेट परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ व अर्थकारणाला मिळालेली चालना याचे स्पष्ट संकेत देत असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या.

असे असले तरी जागतिक अर्थव्यवस्थेसमोर असलेले कोरोनाची साथ तसेच महागाईचे संकट संपलेले नाही, याकडे सीईबीआरच्या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

leave a reply