लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची नवी फेरी सुरू करण्यावर भारत-चीनचे एकमत

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये चर्चेची चौदावी फेरी सुरू करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याची माहिती दिली. याआधी पार पडलेल्या चर्चेच्या तेरा फेर्‍यानंतरही लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी झालेला नाही. असे असले तरी दोन्ही देशांनी चर्चेद्वारे ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांची सहमती झालेली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची नवी फेरी सुरू करण्यावर भारत-चीनचे एकमतलडाखच्या कडक हिवाळ्यात चिनी जवान गारठून सतत आजारी पडत असल्याच्या बातम्या गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर्षीही चीनच्या हटवादीपणामुळे लडाखच्या एलएसीवर आपले जवान तैनात ठेवणार्‍या चीनला फार मोठी हानी सोसावी लागेल, असे दिसत आहे. मात्र लडाखच्या हिवाळ्याचा सामना करण्यासाठी आपल्या लष्कराने जय्यत तयारी केलेली आहे, असे दावे ठोकून चीनची सरकारी मुखपत्रे भारतीय सैन्याला या हिवाळ्याचा अधिक त्रास सहन करावा लागेल, असे हास्यास्पद दावे करीत आहेत. यामुळे चीनची अस्वस्थता व असुरक्षितता अधिकच ठळकपणे जगासमोर येत आहे. याची जाणीव झाल्याने चीनने अरुणाचलप्रदेशच्या एलएसीवरील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या होत्या. याद्वारे लडाखच्या एलएसीवर आलेल्या अपयशाकडून दुसरीकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न चीनचे लष्कर करीत असल्याचे दिसते.

दरम्यान, दोन्ही देशांमध्ये सीमावादावर पार पडणारी चर्चेच्या या चौदाव्या फेरीत उभय देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्या सप्टेंबर महिन्यात दुशान्बे येथे पार पडलेल्या चर्चेत सीमावाद सोडविण्यासाठी लष्करी व राजनैतिक स्तरावरील चर्चा सुरू ठेवण्याचे मान्य करण्यात आले होते. याची आठवण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात करुन देण्यात आली आहे.

याआधी १० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या चर्चेच्या तेराव्या फेरीत भारतीय लष्कराने सीमावाद सोडविण्यासाठी चीनला काही व्यवहार्य प्रस्ताव दिले होते. भारतीय लष्करानेच याची माहिती उघड केली होती. पण चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी हे प्रस्ताव अवास्तव तसेच एलएसीवरील परिस्थितीशी ताळमेळ नसलेले आहेत, असे सांगून त्याला नकार दिला होता. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने एलएसीबाबत भारत चीनकडे करीत असलेली मागणी, भारताची क्षमता व एलएसीवरील परिस्थितीशी सुसंगत नसल्याची शेरेबाजी केली होती. यामुळे तेराव्या फेरीतील चर्चेनंतर दोन्ही देशांमधील कटूता अधिकच वाढली होती.

त्यानंतरच्या काळात चीनने एलएसीवरील आपल्या लष्कराच्या कारवाया अधिकच वाढविल्या होत्या. तसेच संरक्षण साहित्य व शस्त्रास्त्रांची नवी तैनाती करून चीनने भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. भारताने तोडीस तोड तैनाती करून चीनच्या कारवायांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. म्हणूनच एलएसीवर भारताच्या विरोधात आपण बरेच काही करून दाखवित आहोत, असा आभास चीन तयार करीत आहे. यासाठी चीन प्रचारयुद्धाचा वापर करून त्याद्वारे भारतावरील दडपण वाढविण्याच्या तयारीत आहे. मात्र भारतीय सैन्य चिनी लष्कराची घुसखोरी खपवून घेणार नाही. त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, हे देशाचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे सातत्याने सांगत आहेत. त्याचवेळी चीनच्या प्रचारयुद्धाला बळी पडू नका, असे सांगून देशाचे लष्करी नेतृत्व जनतेला सावधानतेचा इशारा देत आहे.

leave a reply