अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील एलएसीवर भारत व चीनच्या लष्कराची चकमक

तवांगमधील एलएसीवरनवी दिल्ली – 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील एलएसीवर भारतीय सैनिकांची चिनी लष्कराच्या जवानांशी चकमक झाली. यात भारतीय सैनिक व चीनच्या जवानांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र काही काळात दोन्ही देशांच्या लष्कराने इथून माघार घेतली आणि त्यानंतर उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची ‘फ्लॅग मिटिंग’ इथे पार पडली. भारतीय लष्कराने ही माहिती दिली. मात्र चिनी लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे हा संघर्ष झाला, याकडे भारतीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. 2020 साली गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर, तवांगमध्ये दोन्ही देशांच्या लष्करामध्ये झालेली ही चकमक साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

9 डिसेंबर रोजी चिनी लष्कराच्या तुकडीने तवांगमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. पण भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना वेळीच रोखले. यानंतर आणखी काही चिनी जवान या ठिकाणी पोहोचले आणि भारतीय सैनिकांची तुकडीही या ठिकाणी दाखल झाली. यावेळी झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांना दुखापत झाली. पण त्याच्याहून अधिक संख्येने चिनी जवान या संघर्षात जखमी झाल्याचे सांगितले जाते. आपल्याला भारतीय सैन्याकडून अशा स्वरुपाचे उत्तर मिळेल, अशी चिनी लष्कराची अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी हा संघर्ष वाढविण्याच्या ऐवजी इथून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. तवांगच्या एलएसीवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चिनी जवानांची संख्या 300च्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

या संघर्षाची माहिती देऊन भारतीय लष्कराने या संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी इथून माघार घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची फ्लॅग मिटिंग देखील पार पडली व इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भारतीय लष्काराने म्हटले आहे. तसेच एलएसीबाबत दोन्ही देशांची ‘समज’ वेगवेगळी असल्याने हा संघर्ष झाल्याचा दावा लष्कराने केला आहे. तर चीनकडून यावर अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गलवानच्या संघर्षानंतर चिनी लष्कराने तवांगमध्ये पुन्हा एकदा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप सुरू झाले आहेत. वरिष्ठांकडून आदेश मिळाल्याखेरीज चीनचे लष्कर तवांगमध्ये घुसखोरी करणे शक्यच नाही, ही बाब भारताचे माजी लष्करी अधिकारी लक्षात आणून देत आहेत.

डिसेंबर महिन्यात तवांगच्या एलएसीवर गस्त घातली जात नाही. पण चीनने जाणीवपूर्वक गस्तीचा बहाणा करून तवांगमध्ये आपल्या जवानांना पाठविले. यामागे भारताला बेसावध ठेवून घुसखोरी करण्याचा चीनचा डाव होता. मात्र चिनी लष्कराच्या एलएसीवरील हालचालींवर बारीक नजर असलेल्या भारतीय सैन्याने हा डाव हाणून पाडला. चिनी जवानांना आपल्या हद्दीत घुसखोरी करू न देता भारतीय सैनिकांनी त्यांना मागे ढकलले, ही बाब भारतीय सैन्याचा सावधपणा व कणखरपणा दाखवून देत असल्याचे माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी चीन हा विश्वासघातकी देश असल्याची बाब यामुळे पुन्हा एकदा आपल्यासमोर आल्याचे माजी लष्करी अधिकारी सांगत आहेत.

काही दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकन लष्कराचा एलएसजीजवळील भागात संयुक्त युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. या युद्धसरावावर चीनने आक्षेप घेतला. भारत आणि चीनमध्ये झालेल्या सीमाविषयक करारांची आठवण करून देऊन भारत-अमेरिकेचा संयुक्त युद्धसराव या करारांचे उल्लंघन करणारा असल्याचा ठपका चीनने ठेवला होता. तसेच अमेरिकेने भारत व चीनच्या सीमावादात नाक खुपसू नये, असे चीनने बजावले होते. त्यावर भारताची प्रतिक्रिया आली होती.

भारताने कुणाशी युद्धसराव करायचा, हे ठरवण्याचा अधिकार भारताने चीनला बहाल केलेला नाही. त्यामुळे चीन भारताच्या या युद्धसरावावर आक्षेप घेऊ शकत नाही, असे भारताने बजावले होते. तसेच या युद्धसरावामुळे चीनबरोबरील सीमाकरारांचे उल्लंघन होत नसल्याची बाबही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लक्षात आणून दिली होती. तसेच सीमाकराराच्या उल्लंघनाचे आरोप भारतावर करणाऱ्या चीननेच या करारांचा अधिक आदर करावा, असा टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला होता. भारताचा अमेरिकेबरोबरील संयुक्त युद्धसराव हे चीनने तवांगमध्ये केलेल्या घुसखोरीमागचे कारण असावे, असे दावे सामरिक विश्लेषकांकडून केले जात आहेत. कारण या युद्धसरावामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे या सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

याच्याही पलिकडे जाऊन काही माजी लष्करी अधिकारी व विश्लेषकांनी या घुसखोरीमागे चीनमधील अंतर्गत परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. झीरो कोविड पॉलिसीच्या नावाखाली चीनने आपल्या शहरांमधील नागरिकांना जणू घरातच कैद करून ठेवलेले आहे. यामुळे चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर जनता संतापली असून राजधानी बीजिंगसह चीनच्या इतर शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. जनतेच्या सरकारविरोधी आंदोलनाची परंपरा नसलेल्या या देशात सुरू झालेली ही निदर्शने म्हणजे चीनच्या राजवटीला बसलेले हादरे असल्यचे दावे केले जातात. यापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी चीन भारत तसेच इतर शेजारी देशांबरोबर सीमावाद उकरून काढू शकतो, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी याआधीच नोंदविला होता. तवांगमधील घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतीय विश्लेषक देखील चीनवर तशाच स्वरुपाचे आरोप करीत आहेत. अमेरिकन अभ्यासगटांनी व विश्लेषकांनीही चीन पुन्हा एकदा भारताच्या सीमाभागात घुसखोरी करील, असा निष्कर्ष नोंदविला होता.

leave a reply