एलएसीवरील चिनी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून प्रगत ‘हेरॉन’ ड्रोन्स तैनात

नवी दिल्ली – गेल्याच महिन्यात चिनी लष्कराने लडाखच्या एलएसीनजिक मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. चीनकडून सुरू असलेल्या या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी भारताने चार हेरॉन ड्रोन्स एलएसीवर तैनात केले आहेत. सध्या भारतीय संरक्षणदलात असणार्‍या ड्रोन्सपेक्षा ही ड्रोन्स अधिक प्रगत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

भारत सरकारने संरक्षणदलांना दिलेल्या ‘इमर्जन्सी फायान्शिअल पॉवर्स’चा वापर करून इस्रायलकडून अतिरिक्त ड्रोन्स घेण्यात आली होती. गेल्याच महिन्यात ही ड्रोन्स भारतात दाखल झाली होती. त्यानंतर ती तातडीने लडाखच्या एलएसीवर तैनात करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भारताने यापूर्वी घेतलेल्या हेरॉन ड्रोन्सची ही प्रगत आवृत्ती असून नव्या ड्रोन्समधील अँटी जॅमिंग तंत्रज्ञान अधिक पुढारलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एलएसीवरील चिनी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून प्रगत ‘हेरॉन’ ड्रोन्स तैनातगेल्या वर्षी चीनबरोबर झालेल्या संघर्षानंतर भारताने आपली संरक्षणसज्जता तसेच एलएसीवरील तैनाती वाढविण्यासाठी वेगवान पावले उचलली आहेत. चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, तोफा तसेच ड्रोन्सची मोठी तैनाती करीत आहे. इस्रायलकडून घेण्यात आलेल्या हेरॉन ड्रोन्सची तैनातीही त्याचाच भाग ठरतो.

इस्रायलव्यतिरिक्त भारतीय संरक्षणदलांनी अमेरिका तसेच स्वदेशी कंपन्यांकडूनही मोठ्या प्रमाणात ड्रोन्स घेण्यास सुरुवात केली असून त्याचा वापर सीमेनजिकच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. येत्या काही वर्षात भारत अमेरिकेकडून ३० प्रिडेटर ड्रोन्स खरेदी करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

गेल्या काही महिन्यात, चीनने एलएसीवरील आपल्या लष्कराच्या कारवाया अधिकच वाढविल्या होत्या. संरक्षण साहित्य व शस्त्रास्त्रांची नवी तैनाती करून चीनने भारतावर दडपण टाकण्याचाही प्रयत्न केला. पण भारताने तोडीस तोड तैनाती करून चीनच्या कारवायांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्य चिनी लष्कराची घुसखोरी खपवून घेणार नाही. त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, अशी कणखर भूमिका देशाचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत व लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे सातत्याने मांडत आहेत.

भारताने स्वीकारलेल्या या आक्रमक भूमिकेचे फार मोठे दडपण चीनवर आले असून याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. भारताने चीनचे लष्करी दडपण झुगारून दिले व चीनला धड शिकविल्याची चर्चा गेल्या वर्षी गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर सुरू झाली होती. यामुळे अस्वस्थ झालेला चीन भारताच्या विरोधात आपण बरेच काही करीत असल्याचा आभास निर्माण करीत आहे. मात्र यासाठी प्रचारयुद्ध छेडूनही चीनला अपेक्षित असलेले यश मिळू शकलेले नाही.

leave a reply