अमेरिकेच्या दबावाची पर्वा न करता भारत रशियन इंधनाची खरेदी दुपटीने वाढविणार

इंधनाची खरेदीनवी दिल्ली/मॉस्को – अमेरिकेचे इशारे आणि धमक्या मिळत असताना, भारताने रशियाकडून अधिक प्रमाणात इंधनाची खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी भारत रशियाकडून कोळसा खरेदी करण्यावर विचार करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेची पर्वा न करता, देशहिताचे निर्णय घेणार्‍या भारताची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. थोड्याच देशांना असा बाणेदारपणा दाखविणे शक्य होते, असा टोला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी लगावला आहे.

रशियाकडून इंधनाची खरेदी करणे भारताच्या हिताचे नाही, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही याच शब्दात भारताला रशियाबरोबरील या व्यवहारावरून बजावले होते. तर अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग यांनी भारताच्या रशियाबरोबरील व्यवहाराचे गंभीर परिणाम होतील, अशी थेट शब्दात धमकी दिली होती. मात्र भारत महिनाभरात रशियाकडून खरेदी करतो, तितके इंधन युरोपिय देश अर्ध्या दिवसात रशियाकडून खरेदी करतात, असे सांगून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचा दुटप्पी धोरणावर नेमके बोट ठेवले होते.

तसेच भारताचा रशियाबरोबरील इंधनव्यवहार कुठल्याही नियमांचा भंग करणारा नाही, याचीही जाणीव जयशंकर यांनी करून दिली होती. तरीही अमेरिकेने भारताच्या या व्यवहारावर आक्षेप मागे घेतलेला नाही. अशा परिस्थितीत भारत रशियाकडून खरेदी करीत असलेल्या इंधनाचे प्रमाण दुपटीने वाढविण्याची तयारी करीत आहे. भारतीय इंधन कंपन्या यासाठी रशियन कंपन्यांशी वाटाघाटी करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबरोबरच भारत रशियाकडून कोळशाचीही खरेदी करणार असल्याचे दावे केले जात आहेत.

अमेरिकेसारख्या महासत्तेच्या दडपणाखाली येऊन भारत आपल्या धोरणात बदल करीत नाही, याची नोंद घेऊन रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताची प्रशंसा केली. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर सच्चे देशभक्त असून त्यांनी अमेरिकेतच भारत देशहिताला प्राधान्य देईल, असे जाहीर केले. फारच कमी देशांना असा बाणेदारपणा दाखविणे शक्य होते, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी म्हटले आहे.

याबरोबरच रशिया आपल्या अन्नसुरक्षा, संरक्षण व इतर धोरणात्मक क्षेत्रांसाठी यापुढे युरोपिय देशांवर अवलंबून राहणार नाही. यासंदर्भात रशिया पाश्‍चिमात्यांच्या दडपणाखाली न येणार्‍या भारताशी सहकार्य करील, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गलवान खोर्‍यात चीनच्या लष्कराबरोबर भारतीय सैन्याचा संघर्ष झाल्यानंतर, भारताने अमेरिकेच्या प्रभावाखाली येऊन चीनविरोधी कारस्थानात सहभागी होऊ नये, असे आवाहन रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले होते. यावरून त्यांनी भारताच्या विरोधात काही विधानेही केली होती. कालांतराने त्यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली. हेच परराष्ट्रमत्री लॅव्हरोव्ह आता भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करीत आहेत, ही लक्षणीय बाब ठरते.

leave a reply