इंधनासाठी केवळ भारतानेच श्रीलंकेला सहाय्य पुरविले

- श्रीलंकेचे इंधनमंत्री कांचना विजसेकरा

कोलंबो – इतर देशांकडेही आम्ही इंधनासाठी सहाय्य करा अशी विनंती केली होती. पण आत्तापर्यंत केवळ भारतानेच श्रीलंकेला इंधनाच्या खरेदीसाठी कर्जासहाय्य उपलब्ध करून दिले,असे श्रीलंकेचे वीज व इंधनमंत्री कांचना विजसेकरा यांनी म्हटले आहे. तर संकटात सापडलेल्या श्रीलंकेची लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिकदृष्ट्या हा देश पूर्वपदावर यावा यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्वासन भारताने दिले आहे.

इंधनासाठीगोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, श्रीलंकेतील निदर्शनांची तीव्रता काहिशी कमी झालेली असली तरी या देशातील परिस्थिती सुधारलेली नाही. श्रीलंकेतील सुमारे 60 लाखाहून अधिक जण किंवा या देशाच्या जनसंख्येपैकी 28 टक्के जनतेची अन्नसुरक्षा धोक्यात आलेलीआहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. अन्न, औषधे, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या तुटवड्याने ग्रासलेल्या श्रीलंकेतील जनजीवन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, श्रीलंका इतर देशांचे सहाय्य मिळविण्यासाठी धडपडत आहे.

या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेचे वीज व इंधनमंत्री कांचना विजसेकरा यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. देशातील इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करा, अशी मागणी श्रीलंका इतर देशांना करीत आहे. पण आत्तापर्यंत केवळ भारतानेच आम्हाला इंधनाच्या आघाडीवर सहाय्य करून यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले, असे विजसेकरा म्हणाले. त्याचवेळी रशिया व इतर देशांशी आपण इंधनासंदर्भात चर्चा करीत असल्याची माहिती विजसेकरा यांनी दिली.

दरम्यान, या खडतर परिस्थितीत श्रीलंकेची लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिकदृष्ट्या श्रीलंका पूर्वपदावर यावा यासाठी भारत सर्वतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही श्रीलंकेतील भारतीय दूतावासाचे उच्चयुक्त गोपल बगलाय यांनी दिली. श्रीलंकेच्या संसदेचे सभापती महिंदा यापा अबेयवरदेना यांच्याबरोबरील चर्चेत भारताच्या उच्चायुक्तांनी हे आश्वासन दिले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या निवेदनात श्रीलंकेला भारताचे सहाय्य मिळेल, असे आश्वासन दिले आहे. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही भारत ‘नेबरहूड फर्स्ट’ अर्थात शेजारी देशांना सर्वाधिक प्राधान्य या तत्त्वावर श्रीलंकेला सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते.

श्रीलंकेची सध्याची स्थिती चीनच्या कर्जामुळेच झाल्याचे आरोप होत आहेत. चीनकडून हे कर्ज स्वीकारून चुकीची आर्थिक धोरणे राबविणारे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे, गोटाबाया राजपक्षे व त्यांचा परिवार श्रीलंकन जनतेच्या तिरस्काराचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून रानिल विक्रमसिंघे यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. तर श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सजिद प्रेमदासा, अनुराग कुमारा दिसानायके, दुलास अलाहपेरूमा यांची नावेही चर्चेत आहेत.

leave a reply