‘न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप’च्या सदस्यत्वासाठी भारत इतर देशांच्या संपर्कात

नवी दिल्ली – अणुकार्यक्रमासाठी लागणार्‍या घटकांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारा आंतरराष्ट्रीय गट असणार्‍या ‘न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप’च्या(एनएसजी) सदस्यत्त्वासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. या मुद्यावर भारत ‘एनएसजी’तील इतर सदस्य देशांच्या संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी संसदेत दिली. अमेरिकेने याप्रकरणी भारताला उघड पाठिंबा दिल्याचेही परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी सांगितले.

‘न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप’च्या सदस्यत्वासाठी भारत इतर देशांच्या संपर्कातसध्या ‘एनएसजी’मध्ये ४८ सदस्य देशांचा समावेश असून त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशिया व चीन यासारख्या देशांचा समावेश आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून या गटाचे सदस्यत्त्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स यासह अनेक देशांनी ‘एनएसजी’च्या सदस्यत्वासाठी भारताचे समर्थन केले आहे. मात्र चीनकडून भारताच्या सदस्यत्वाच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळे आणले जात आहेत.

भारताने ‘न्यूक्लिअर नॉन प्रोलायफरेशन ट्रिटी’वर स्वाक्षर्‍या केलेल्या नाहीत, असा आक्षेप चीनकडून वारंवार घेतला जात आहे. ‘एनएसजी’त नव्या सदस्याची निवड सर्वानुमते होत असल्याने चीनचा विरोध अडचणीचा ठरत आहे. मात्र असे असले तरी भारत इतर सदस्य देशांच्या माध्यमातून ‘एनएसजी’चे सदस्यत्त्व मिळविण्यासाठी बोलणी करत असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. ‘एनएसजी’बरोबर संयुक्त राष्ट्रसंघटनेतील सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठीही भारताच्या हालचाली सुरू असून अमेरिकेसह अनेक देशांनी त्याला समर्थन दिल्याची माहितीही परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी दिली.

leave a reply