भारत गरीबीच्या विरोधात तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बंगळुरू – भारत गरीबीच्या विरोधातील शस्त्रासारखा तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. भारताचे तंत्रज्ञान आणि संशोधन साऱ्या जगाला प्रभावित करीत आहे. पण या वर्तमानापेक्षाही देशाचे या क्षेत्रातील भविष्य अधिकच उज्ज्वल असेल. कारण भारताकडे प्रतिभाशाली युवावर्ग आहे आणि आवश्यक तंत्रज्ञानाचा पाया देखील उपलब्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘बंगळुरू टेक समिट’ला संबोधित करताना पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त केला.

modi_bengalur‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये २०१५ साली ८१ व्या स्थानावर असलेला भारत या वर्षी ४० व्या क्रमांकावर आला आहे. वर्षभरात भारतातील युनिकॉर्न अर्थात शंभर कोटी डॉलर्सपर्यंत झेप घेणाऱ्या स्टार्टअप्सची संख्या दुपटीहून अधिक प्रमाणात वाढली आहे. भारत स्टर्टअप्सचे तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र म्हणून उदयाला येत आहे. देशात ८१ हजाराहून अधिक प्रमाणात अधिकृत स्टार्टअप्स आहेत. त्याचवेळी शेकडो आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले विकास व संशोधन केंद्र भारतात हलविले आहे. हे सारे भारतात उपलब्ध असलेल्या प्रतिभाशाली युवावर्गामुळे होत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भारतात मोबाईल आणि डाटा रिव्होल्युशन अर्थात डाटा क्रांती घडत असून गेल्या आठ वर्षात देशातील ब्रॅडबँडचे कनेक्शन्स ८१ कोटीवर गेली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. स्मार्टफोन्सचा वापर करणाऱ्यांची संख्या ७५ कोटींवर गेली आहे. शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागातील इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात वाढतो आहे आणि जनसंख्येचा फार मोठा भाग माहितीच्या महामार्गाशी जोडला जात आहे. याद्वारे भारत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करीत असून जगाला तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श कसा द्यायचा हे दाखवून देत आहे. भारतात तंत्रज्ञान हे समानता प्रस्थापित करणारे व कमकुवत वर्गाला सशक्त करणारे शक्तीशाली माध्यम बनले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्याचे दाखले देखील दिले.

कोविन ॲपद्वारे भारताने जगातील सर्वात मोठी कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम यशस्वी करून दाखविली. आयुष्यमान भारत योजनेद्वारे भारताने सुमारे २० कोटी कुटुंबांना आरोग्यसुरक्षा पुरविली. हे दोन्ही तंत्रज्ञानावर आधारलेले प्लॅटफॉर्म्स होते. ऑनलाईन शिक्षणाच्या आघाडीवरही भारत खूपच पुढे आहे. या माध्यमातून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे केंद्र म्हणूनही भारत उदयाला येत आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

भारतात कमी दरात इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने कोरोनाची साथ आलेली असताना, कित्येकजणांना ऑनलाईन शिक्षण घेता आले, याचीही जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.

leave a reply