भारताने कोरोनाबाबतचे अंदाज चुकीचे ठरविले

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाबाबतचे अंदाजनवी दिल्ली – ‘कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका भारताला बसेल आणि या देशात ७० ते ८० कोटी जण कोरोनाने संक्रमित होतील. तसेच भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या २० लाखांवर जाईल, असे भीतीदायक इशारे काहीजणांनी दिले होते. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात विकसित देशांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्यानंतर फार मोठी जनसंख्या असलेल्या भारताबाबत जगाला वाटणारी चिंता स्वाभाविक होती. पण भारताने हे सारे अंदाज चुकीचे ठरविले. आज कोरोनाची संख्या अत्यंत कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या आणखी लसी भारतात विकसित होत असून त्या जगाला पुरविल्या जातील’, असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅव्होस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत काढले. या बैठकीत पंतप्रधान व्हर्च्युअल माध्यमाद्वारे सहभागी झाले.

काहीजणांकडून भीतीदायक इशारे दिले जात असताना, भारताने निराश होण्याचे नाकारले आणि सक्रीय लोकसहभाग व कोरोनाकेंद्रीत आरोग्यसेवा तसेच मनुष्यबळाचा सुयोग्य वापर, यावर भर दिला. तसेच तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून भारताने ही साथ नियंत्रणात ठेवली. भारतातील प्रत्येकाने या साथीचा धैर्याने मुकाबला केला व कोरोनाच्या विरोधातील लढ्याला जनआंदोलनाचे स्वरुप दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन कोटी जणांना ही लस पुरविण्यात येईल. पुढच्या काही महिन्यात सुमारे ३० कोटी वयोवृद्ध व रुग्णांना ही लस दिली जाईल. अवघ्या १२ दिवसात भारताने २३ लाख जणांना ही लस उपलब्ध करून दिली, यावरून भारताच्या लसीकरणाची मोहीम किती वेगाने पुढे चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कोरोनाचे संकट आलेले असतानाभारताने पायाभूत सुविधांचे लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून अर्थव्यवहाराला गती दिली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पुढच्या काळात भारताचे अर्थकारण गतीमान होईल. आत्मनिर्भर भारताचे अभियान जागतिकीकरणाची प्रक्रिया अधिकच भक्कम करील आणि औद्योगिकीकरणाचा वेग यामुळे वाढेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी कोरोनाच्या काळात आपल्या नागरिकांपर्यंत सहाय्य कसे पोहोचवावे, या चिंतेत काही देश असताना, भारतात मात्र डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने पुढे चालली आहे. केवळ डिसेंबर महिन्यातच ‘युपीआय’मार्फत चाल लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. तसेच डिजिटल व्यवहारांचा वापर करून भारताने ७६ कोटी लाभार्थ्यांपर्यंत १.८ लाख कोटी रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये पोहोचविले, याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाने दिलेल्या धड्यातून आपण मानवी मुल्यांचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. तंत्रज्ञान मानवी जीवन सुखकर करण्यासाठी आहे, त्याचा सापळा बनता कामा नये, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला.

भारताने जगाला ५५ लाख लसी भेट म्हणून दिल्या – परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा
भारताने आत्तापर्यंत आपल्या शेजारी व त्या पलिकडील क्षेत्रातील देशांना सुमारे ५५ लाख कोरोना प्रतिबंधक लसी भेट म्हणून दिल्या आहेत. यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मॉरिशस, सेशल्स म्यानमार, भूतान, मालदीव, बाहरिन या देशांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली.

ब्राझिल, मोरोक्को या देशांना भारताने लसींचा पुरवठा केल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. पुढच्या काळात सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ओमान, मंगोलिया, निकारागुआ, कॅनडा व कॅरेबियन देशांनाही भारताकडून लस पुरविली जाणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्यसेवकांसाठी सुमारे दहा लाख लसींचा पुरवठा भारताकडून केला जाईल. आफ्रिकन देशांना एक कोटी लसी पुरविल्या जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद बिन नह्यान यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या विरोधातील सहकार्य तसेच भारतातील युएईच्या गुंतवणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते.

leave a reply