भारत-फिलिपाईन्स ब्रह्मोस करार गेमचेंजर ठरेल

- आशियाई विश्‍लेषकांचा दावा

मनिला/नवी दिल्ली – फिलिपाईन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय भारतासाठी गेमचेंजर ठरेल, असा दावा आशियाई विश्‍लेषकाने केला आहे. हा निर्णय भारतासाठी आशियाई देशांमधील संरक्षणनिर्यातीचे दरवाजे खुले करणारा ठरेल, असे विश्‍लेषक रिचर्ड हेडॅरियन यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील याचा करार पूर्णत्त्वास जात असतानाच, भारताचे परराष्ट्रमंत्री पुढच्या आठवड्यात फिलिपाईन्सला भेट देणार आहेत. चीनपासून संभवणार्‍या धोक्या पार्श्‍वभूमीवर, फिलिपाईन्सचे भारताबरोबरील हे लष्करी सहकार्य फार मोठे सामरिक परिणाम साधणारे आहे.

भारत-फिलिपाईन्स ब्रह्मोस करार गेमचेंजर ठरेल - आशियाई विश्‍लेषकांचा दावाफिलिपाईन्सच्या नौदलासाठी भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रे पुरविण्याचा करार केला आहेच. पण आता फिलिपाईन्सच्या लष्करालाही भारताकडून ही क्षेपणास्त्रे हवी आहेत. तसेच व्हिएतनाम देखील भारताकडून ब्रह्मोसची खरेदी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे भारताचे आग्नेय आशियाई देशांबरोबरील लष्करी सहकार्य तसेच संरक्षणविषयक निर्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असे संकेत मिळत आहेत. याची दखल विश्‍लेषक रिचर्ड हेडॅरियन यांनी घेतली. भारत व फिलिपाईन्समधील सहकार्यामुळे भारतासाठी आग्नेय आशियाई देशांमध्ये संरक्षणविषयक निर्यातीचे दालन खुले होईल, असा विश्‍वास हेडॅरियन यांनी व्यक्त केला.

आग्नेय आशियाई देशांबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी भारताने स्वीकारलेल्या ‘लूक ईस्ट’ धोरणाचा विचार करता हे फार मोठे पाऊल ठरते. चीनच्या विरोधात छोट्या आशियाई देशांना सहाय्य पुरविण्याचे धोरण, भारत-अमेरिका-जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड संघटनेने स्वीकारले होते. भारताकडून फिलिपाईन्सला पुरविली जात असलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्रे हा त्याचाच भाग ठरतो, असा दावाही विश्‍लेषक रिचर्ड हेडॅरियन यांनी केला.

भारत-फिलिपाईन्स ब्रह्मोस करार गेमचेंजर ठरेल - आशियाई विश्‍लेषकांचा दावापुढच्या काळात ब्रह्मोसची हायपरसोनिक आवृत्ती तयार केली जाईल. भारताकडून त्याचीही खरेदी करण्याची तयारी फिलिपाईन्सने केल्याची दाट शक्यता हेडॅरियन यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात व्हिएतनाम व इंडोनेशिया हे देश देखील चीनविरोधात आपली सज्जता वाढविण्यासाठी भारताचे सहाय्य घेतील, असा निष्कर्ष हेडॅरियन यांनी नोंदविला आहे.

या सार्‍या गोष्टी लक्षात घेतल्या तर भारत आणि फिलिपाईन्समध्ये झालेला हा ब्रह्मोसचा करार, आधुनिक काळातील भारताच्या आग्नेय आशियाई देशांबाबतच्या परराष्ट्र धोरणात फार मोठ्या बदलांचे संकेत देत आहे, असा दावा विश्‍लेषक हेडॅरियन यांनी केला. यामुळे भारताची संरक्षणविषयक निर्यात वाढेल आणि त्याच प्रमाणात या क्षेत्रातील भारताचा प्रभावही वाढेल, असे संकेत हेडॅरियन यांनी दिला आहे.

leave a reply