भारताने अफगाणिस्तानच्या हेरात व जलालाबादमधील राजनैतिक अधिकाऱ्याना काबूलमध्ये हलविले

नवी दिल्ली – अफगाणिस्तानची सीमारेषा मोठ्या प्रमाणावर इराणला भिडलेली असल्यामुळे, इथे वेगाने कोरोनाव्हायरसचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानातील हेरात आणि जलालाबादमधील दूतावासाचे राजनैतिक अधिकारी व कर्मचारी यांना राजधानी काबूलमध्ये हलविले आहे.

या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधांची वानवा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये शंभरहून अधिक जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. ही संख्या मोठी असल्याची भिती व्यक्त केली जाते. कारण अफगाणिस्तानमधल्या काही प्रांतामध्ये आरोग्यविषयक सुविधांची वानवा आहे. त्यात अफगाणिस्तानची सीमारेषा इराणला मोठ्या प्रमाणावर भिडलेली असल्यामुळे इथे या साथीचा वेगाने प्रसार होऊ शकतो.

खबरदारीचा उपाय म्हणून भारताने हेरात आणि जलालाबादमधील राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी काबूलमध्ये हलविले आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये दोन परदेशी राजदूत आणि नाटोच्या चार अधिकाऱ्याना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. या कारणामुळेच भारताने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

leave a reply