सायबर, अंतराळ, प्रचारतंत्रासारख्या नव्या युद्धक्षेत्रासाठी भारताने सज्ज रहावे

- भारतीय वायुसेनाप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून नियमांची अजिबात पर्वा न करता जागतिक व्यवस्थेला अधिकाधिक आव्हान देण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा काळात भारताने सायबर, अंतराळ व प्रचारतंत्रासारख्या नव्या युद्धक्षेत्रासाठी सज्ज रहावे. भारताने धोरणात्मक प्राधान्यक्रम निश्चित करून आपण या स्पर्धेत मागे राहणार नाही याची काळजी घ्यावी, असा इशारा भारताचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिला. मात्र हे सारे करीत असताना लष्करी अधिकाऱ्यांनी थेट युद्धाच्या शक्यतेकडे पाठ फिरवू नये, असेही वायुसेनाप्रमुखांनी बजावले.

new-war-onesयुक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील युद्धतंत्र बदलल्याचा दावा केला जातो. भारताचे संरक्षणमंत्री तसेच संरक्षणदलप्रमुख याबाबत आपल्या अधिकाऱ्यांना तसेच देशातील जनतेला सावध करीत आहेत. वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी ‘वॉरफेअर अँड एरोस्पेस स्ट्रॅटेजी प्रोग्राम-डब्ल्यूएसपी’ या कार्यक्रमात बोलताना याबाबत इशारा दिला. वायुसेनेने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एअर चीफ मार्शल चौधरी यांनी गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या घडामोडींचा दाखला दिला.

लडाखच्या एलएसीवर चीनबरोबरचा संघर्ष, अफगाणिस्तानातील अराजकता आणि युक्रेनच्या युद्धामुळे सुरू असलेल्या उलथापालथींबाबत बोलताना वायुसेनाप्रमुखांनी कुठल्याही देशाचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. ‘सायबर, अंतराळ आणि प्रचारतंत्रासारख्या क्षेत्रातील घुसखोरी हा आता नव्या धोरणाचा भाग बनला आहे. त्यामुळे भारताने आपले धोरणात्मक प्राधान्यक्रमांचा फेरविचार करायला हवा आणि यात आपण कुठेही मागे राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी’, असे आवाहन वायुसेनाप्रमुखांनी केले. या नव्या युद्धक्षेत्रासाठी तयारी करीत असताना संरक्षणदलांनी थेट युद्ध शक्यतेकडे दुर्लक्ष न करता सज्ज राहायला हवे असे वायुसेनाप्रमुख म्हणाले.

leave a reply