अफगाणिस्तानला पुरविल्या जाणार्‍या सहाय्यावर शर्ती लादणार्‍या पाकिस्तानला भारताने फटकारले

नवी दिल्ली – भारत अफगाणिस्तानला पुरवित असलेले मानवी सहाय्य रोखून त्यावर अटी व शर्ती लादणार्‍या पाकिस्तानला भारताने फटकारले आहे. या मानवतावादी सहाय्याबाबत लादल्या जाणार्‍या अटी व शर्ती भारत स्वीकारणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. अफगाणिस्तानसाठी भारताने सुमारे पन्नास हजार मेट्रिक टन इतका गहू तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्याची तयारी केली आहे. मात्र भारतीय ट्रक्समधून याचा पुरवठा केला जाऊ नये, हे सहाय्य भारताने पाकिस्तानच्या सीमेवर आणून सोडावे व पाकिस्तानच हे साहित्य अफगाणिस्तानला देईल, अशी अट पाकिस्तानच्या सरकारने घातली होती.

अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भारताची चिंतातालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता आल्यानंतर, अफगाणी जनतेला पुरविले जाणारे आंतरराष्ट्रीय सहाय्य बंद झाले आहे. यामुळे अफगाणी जनतेवर उपासमारीची वेळ ओढावली असून हिवाळ्याच्या काळात हे संकट भयंकर स्वरुप धारण करील, असा इशारा आंतरराष्ट्रीय संघटना देत आहेत. अशा काळात अन्नधान्याची टंचाईने ग्रासलेल्या या देशातील जनतेला भारताने तब्बल पन्नास हजार मेट्रिक टन इतका गहू तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. ७ ऑक्टोबर रोजी भारताने याचा प्रस्ताव देऊन पाकिस्तानने या सहाय्यासाठी मार्ग देण्याचे आवाहन केले होते.

भारताकडून अफगाणिस्तानला इतक्या प्रचंड प्रमाणात सहाय्य पुरविल्यानंतर, अफगाणी जनतेमधील भारताची प्रतिमा अधिकच उजळून निघेल, या चिंतेने पाकिस्तान धास्तावल्याचे समोर आले होते. या कारणामुळे पाकिस्तानने या प्रस्तावाला प्रतिसाद देताना भरपूर वेळ घेतला. २४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने यासाठी आपण तयार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यासाठी पाकिस्तानने फार मोठ्या अटी लादल्या आहेत. याची माहिती माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी उघड झाली. भारताच्या ट्रक्समधून हा गहू व औषधे पाकिस्तानच्या सीमेवर आणून सोडावी व त्यानंतर पाकिस्तानचे ट्रक्स हे सहाय्य अफगाणिस्तानात पोहोचवेल, असे पाकिस्तानने म्हटले होते.

अफगाणिस्तानला पुरविल्या जाणार्‍या सहाय्यावर शर्ती लादणार्‍या पाकिस्तानला भारताने फटकारलेसध्या पाकिस्तानात अन्नधान्याची टंचाई व महागाई थैमान घालत आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानसाठी पाठविलेला गहू मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातच वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भारताने पाकिस्तानची ही मागणी नाकारली असून मानवतावादी सहाय्यासाठी कुठल्याही स्वरुपाच्या अटी व शर्ती मान्य करता येणार नाही, असे भारताने बजावले आहे. यासंदर्भात पाकिस्तानशी चर्चा सुरू असून याचे तपशील लवकरच उघड केले जातील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. तसेच अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारत समान दृष्टीकोन असलेल्या देशांशी चर्चा करीत असल्याचे सूचक उद्गार यावेळी बागची यांनी काढले.

पाकिस्तानने स्वीकारलेल्या या अडवणुकीच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची अधिकच नाचक्की होऊ शकते. एकीकडे अफगाणी जनतेसाठी गळे काढणारा पाकिस्तान मानवी सहाय्यासाठी आपला रस्ता खुला करण्याचे किमान सहकार्य करण्यास तयार नाही, हा संदेश यामुळे अफगाणिस्तानसह सार्‍या जगाला मिळालेला आहे. त्यामुळे पाकिस्तानला अफगाणी जनतेशी काही देणेघेणे नसून विध्वंसक मानसिकतेचा हा देश अशा भयंकर मानवी आपत्तीच्या काळातही स्वार्थांध धोरणे राबवित असल्याचे जगासमोर येत आहे. याचा फार मोठा फटका पुढच्या काळात पाकिस्तानला बसू शकतो. यावर तालिबानकडून प्रतिक्रिया उमटू शकते.

leave a reply