भारताकडून बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेला औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

भारताकडून बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेला औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या भयंकर साथीचा सामना करीत असलेल्या बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेला भारताने औषधे आणि मेडिकल किट्सचा पुरवठा सुरू केला आहे. यामध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी सर्वात प्रभावी ठरलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांसह, ग्लोव्ह्ज, मास्क या वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. या मदतीसाठी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेने भारताचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांच्या प्रमुखांशी टेलीकॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता आणि कोरोनाच्या आपत्तीत या देशांसाठी सहाय्याचा हात पुढे केला होता. भारताच्याच पुढाकाराने सार्कने ‘कोविड-१९’ फंड स्थापन केला व यातून सार्क देशांना कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी सहाय्य पुरविले जाणार आहे.

बांग्लादेशमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीत १४० जणांचा बळी गेला आहे. याचे ५००० रूग्ण आढळले आहे. श्रीलंकेत या साथीचे ७ जण दगावले असून ४२० रूग्ण या देशात आहेत. नेपाळमध्ये या साथीचे ५२ रूग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत भारताकडून या देशांना पुरविले जाणारे सहाय्य महत्वपूर्ण ठरते.

रविवारी भारताकडून बांगलादेशला एक लाख हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन टॅबलेट्स आणि पन्नास हजार ग्लोव्ह्ज पाठविण्यात आल्या. याआधी भारताने बांगलादेशमधील डॉक्टरांसाठी मास्क आणि हेड कव्हर्स दिले होते. रविवारी ही मदत मिळाल्यानंतर बांगलादेशचे आरोग्य मंत्री जाहिद मलिक यांनी भारताचे आभार मानले.

तिकडे नेपळलाही भारताने वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारताने नेपाळला २३ टन औषधे व वैद्यकीय साहित्य पुरविले आहे. नेपाळने दिलेल्या या वैद्यकीय साहित्यामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅराॅसिटामल या औषधांचा समावेश आहे. नेपाळमधील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी ही सर्व औषधे व साहित्य नेपाळचे आरोग्य मंत्री भानुभक्त धाकल यांच्याकडे सुपूर्द केली. यासाठी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताचे आभार मानले आहेत.

श्रीलंकेलाही भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी ग्लोव्ह्जचा पुरवठा केलेला आहे.

leave a reply