भारत फ्रान्सकडून आणखी रफायल विमाने खरेदी करणार

अमेरिकेच्या हॉर्नेटबरोबरील स्पर्धेत रफायलने बाजी मारल्याचा माध्यमांचा दावा

नवी दिल्ली – विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात करण्यासाठी अमेरिकेच्या ‘एफ-१८ हॉर्नेट’ व फ्रान्सच्या ‘रफायल’ लढाऊ विमानांचा पर्याय भारतासमोर होता. यात ‘रफायल’ने बाजी मारल्याचे संकेत मिळत आहेत. माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाली असून लवकरच वायुसेना व नौदलासाठी ८४ रफायल विमानांची ऑर्डर फ्रान्सला दिली जाणार असल्याचे दावे केले जातात. यापैकी ५७ विमाने वायुसेनाला तर २७ विमाने नौदलासाठी असल्याची चर्चा आहे. भारताने आपल्या वायुसेनेसाठी याआधीच ३६ रफायल विमाने खरेदी केलेली आहेत.

Rafale jetsअमेरिकेच्या बोईंग कंपनीचे ‘एफ-१८ हॉर्नेट’ फ्रान्सच्या डॅसॉल्ट कंपनीचे ‘रफायल’ या लढाऊ विमानांमध्ये भारताकडून कंत्राट मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू होती. भारताने या दोन्ही विमानांच्या चाचण्याही घेतल्या होत्या. मात्र ४५ हजार टन वजनाच्या ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात करण्यासाठी ‘रफायल’ विमाने अधिक प्रभावी ठरतील, या निष्कर्षाप्रत भारतीय नौदल आल्याचा दावा केला जातो. याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही. मात्र भारतीय विमानवाहू युद्धनौकांच्या दीडपट किंवा दुप्पट आकाराच्या अमेरिकी युद्धनौकांवरील तैनातीचा विचार करून ‘एफ-१८ हॉर्नेट’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रफायल लढाऊ विमाने ‘आएनएस विक्रांत’साठी अधिक श्रेयस्कर ठरतील, असे नौदलाने संरक्षण मंत्रालयाला कळविल्याचा दावा केला जातो.

भारताच्या वायुसेनेत ३६ रफायल विमाने आधीपासूनच तैनात आहेत. पुढच्या काळात भारत फ्रान्सकडून ८४ रफायलची खरेदी करील आणि यापैकी २७ विमाने नौदलासाठी तर ५७ विमाने वायुसेनेसाठी असतील असा दावा केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात भारताकडून रफायलसाठी ऑर्डर मिळल्यानंतर, फ्रान्स या विमानांचा निर्मिती प्रकल्प भारतात उभारू शकेल.
तसेच त्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था भारतातच करणे फ्रान्ससाठी सोयीचे ठरू शकते. याबरोबरच फ्रान्स या विमानांच्या तंत्रज्ञानाचेही हस्तांतरण भारताला करील आणि यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य नव्या उंचीवर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गेल्याच महिन्यात फ्रान्सचे संरक्षणमंत्री सॅबेस्टियन लिकोर्नो भारताच्या भेटीवर आले होते व त्यांनी मुंबईच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ची पाहणी केली होती. यावेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या या विमानवाहू युद्धनौकेची प्रशंसा केली होती. ही भारताच्या फ्रान्सबरोबरील व्यवहाराची पूर्वतयारी असल्याचे आता उघड झाले आहे. दरम्यान, भारतीय नौदलाला ५७ नव्या लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचे २०१७ सालच्या नौदलाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. पण भारत स्वतःच ‘ट्विन इंजिन डेक बेस फायटर टेड-बीएफ’ विकसित करीत असून पुढच्या काळात नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांना पुरविली जाऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन नौदलाने ५७ लढाऊ विमानांची मागणी २७वर आणली होती.

leave a reply