नवी दिल्ली – सोमवारी भारत आणि ब्रिटनमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढविण्यावर महत्त्वाची चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) शक्यताही तपासण्यात आल्या. तसेच ‘एफटीए’ आधी दोन्ही देशांमध्ये ‘प्रिफ्रेन्शिअल ट्रेड अॅग्रीमेंट’ (पीटीए) करण्यासंदर्भातही चर्चा झाली. ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुस यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनचे शिष्टमंडळ चार दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहे. कोरोनाव्हायरस आणि ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर भारत व ब्रिटनकडून नव्या बाजारपेठांचा शोध घेतला जात असून व्यापारवाढीवर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची ठरते.
कोरोनामुळे गेल्यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. आर्थिक उलाढाली कमी झाल्या होत्या. त्यामुळे आर्थिक विकासाचा दरही घसरला होता. गेल्या दीड-दोन वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण दिसून येत होते. त्यामध्ये कोरोनाचे संकट ओढावले होते. मात्र याच संकटात भारताला मोठ्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. चीनवर जगभरात वाढलेल्या रोषामुळे या देशातून अनेक कंपन्या बाहेर पडल्या आहेत. तर काही पडण्याच्या बेतात आहेत. अर्थव्यवस्थेवर वाढलेला चीनचा प्रभाव कमी करण्याच्या हालचाली काही देशांनी सुरू केल्या. यामध्ये युरोपिय देशांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर भारताने या देशांना आपली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबर देशातील निर्यातदारांनाही नव्या व्यापारी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाल करीत आहे. ब्रिटन, अमेरिका, युरोपिय महासंघ, आग्नेय आशियातील काही देेशांबरोबर भारत मुक्त व्यापार करारावर करीत असलेली चर्चा याचाच भाग ठरतो.
या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुस यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटनचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. गेल्या वर्षापासून भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होत आहे. शनिवारी पार पडलेल्या चर्चेतही दोन्ही देशांमधील व्यापारी सहकार्य वाढविण्यावर एकवाक्यता झाली. ‘एनहान्स्ड ट्रेड पार्टनरशिप’ (इटीपी) अंतर्गत दोन्ही देशांमधील हे व्यापारी सहकार्य वाढविण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही देशांमधील व्यापारात येणारे अडथळे दूर करण्यासंदर्भात व बाजारपेठ अधिक खुली करण्यासंदर्भात चर्चा झाली.
भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुस यांनी या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांमधील व्यापारवाढीसाठी आराखडा तयार करण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली. ब्रिटनबरोबर ‘एफटीए’ करारासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. मात्र त्याआधी ‘पीटीए’ करार करण्याचा प्रस्ताव भारताने गेल्यावर्षी ठेवला होता. ‘पीटीए’ करार करून काही ठराविक क्षेत्रात मुक्त व्यापाराच्या दिशेने पुढे जाण्याचे भारताने प्रस्तावात म्हटले होते. या मुद्यावरही वाणिज्यमंत्री गोयल आणि ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुस यांच्यामध्ये चर्चा पार पडल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय कोरोनाच्या संकटाशी लढ्याबाबत सहकार्य वाढविण्यावरही चर्चा झाली. यानंतर ब्रिटनच्या व्यापारमंत्री लिझ ट्रुस यांनी पुण्यात कोवॅक्सिन तयार करण्यात येत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पाला भेट दिली.