वॉशिंग्टन – युक्रेनच्या युद्धाबाबत भारत आणि इस्रायलसारख्या अमेरिकेच्या मित्रदेशांनी स्वीकारलेली तटस्थ भूमिका निराश करणारी असल्याचे अमेरिकेचे सिनेटर मार्क वॉर्नर यांनी म्हटले आहे. हा तटस्थपणा दाखवून कुंपणावर बसण्यासारखा मुद्दा नाही, तर चांगले आणि वाईट यातील एकाची निवड करण्याचा प्रश्न आहे, असे सांगून वॉर्नर यांनी दोन्ही लोकशाहीवादी देशांनी आपल्याला निराश केल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेच्या व्हाईटहाऊसमधील वरिष्ठ अधिकारी मिरा राप-हूपर यांनी भारताचे युक्रेन युद्धाबाबतचे धोरण असमाधानकरक असले तरी ते अपेक्षितच होते, असे म्हटले आहे.
युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, भारताने रशियाच्या विरोधात भूमिका घ्यावी, यासाठी अमेरिका भारतावर दडपण टाकत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यासाठी भारतावर टीका केली होती. तरीही भारताने या युद्धात कुणाचीही बाजू घेणार नसल्याचे सांगून आपले धोरण शांततेचा पुरस्कार करणारे असल्याचे जाहीर केले होते. यावर अमेरिका वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी व्यक्त करीत असून याद्वारे भारतावरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताचे समर्थक मानले जाणारे मार्क वॉर्नर अमेरिकन सिनेटच्या ‘सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलिजन्स’चे प्रमुख आहेत. याबरोबरच अमेरिकेच्या इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काम करीत आहेत. त्यांनी युक्रेनच्या युद्धात भारताने स्वीकारलेली भूमिका निराश करणारी असल्याचे म्हटले आहे. वॉर्नर यांनी भारत व इस्रायलसारख्या लोकशाहीवादी देशांनी युक्रेनच्या युद्धाबाबत कुंपणावर बसून कुठलीही भूमिका न घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून ते पटणारे नसल्याचे म्हटले आहे. चांगल्या आणि वाईटमधून एकाची निवड करण्याची वेळ आलेली असताना तटस्थपणा दाखविणे अयोग्य ठरते, अशी टीका वॉर्नर यांनी केली. तर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’मधील ‘इंडो-पॅसिफिक’च्या डायरेक्टर असलेल्या मिरा राप-हूपर यांनी भारताची भूमिका असमाधानकारक असली तरी अनपेक्षित नाही, असा दावा केला. भारताचे रशियाबरोबर ऐतिहासिक संबंध आहेत, हे लक्षात घेता भारताने यासंदर्भात स्वीकारलेली भूमिका अनपेक्षित आहे, असे म्हणता येणार नाही, असे राप-हूपर म्हणाल्या.
भारताचे चीनबरोबरील संबंध तणावपूर्ण बनलेले असताना, भारत रशियाबरोबरील आपल्या संबंधांना अधिक महत्त्व देत आहे, याकडे हूपर यांनी लक्ष ठेवले. त्याचवेळी शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर रशियावरील आपले अवलंबित्त्व कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे, याची नोंद हूपर यांनी केली.
म्हणूनच अमेरिकेने भविष्याचा विचार करून भारताची बाजू समजून भारतासमोर नवे पर्याय ठेवण्याची तयारी करायला हवी, असे हूपर यांनी सुचविले आहे.