पुढच्या वर्षी भारत-अमेरिकेचे सहकार्य नवी उंची गाठेल

अमेरिकेच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारांचा दावा

वॉशिंग्टन – ‘अमेरिका व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन जेव्हा जगाला पुढे नेण्याचा भार वाहण्याकरीता विश्वासार्ह साथीदार देशांसाठी जगाकडे पाहतात, त्यात भारत व भारताच्या पंतप्रधानांचे स्थान सर्वाधिक उंचीवर असते. राष्ट्राध्यक्ष बायडेन भारताबरोबरील अमेरिकेचे सहकार्य सर्वात प्रभावशाली असल्याचे मानतात’, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी केला. वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना फिनर बोलत होते. यावेळी भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी दोन्ही देशांचे सहकार्य म्हणजे ‘टू वे स्ट्रीट’ अर्थात ‘दुतर्फा रस्ता’ असल्याचे सूचक विधान केले.

India-US cooperationहे वर्ष भारत व अमेरिकेच्या संबंधांच्या दृष्टीने जबरदस्त ठरले. पण २०२३ सालात भारत व अमेरिकेचे संबंध याहूनही अधिक उंची गाठतील, असा दावा अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी केला. पुढच्या वर्षी क्वाडची बैठक पार पडेल. याबरोबरच पुढच्या वर्षी भारताकडे जी-२०चे अध्यक्षपद असेल. आम्ही सारेजण त्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहोत. तसेच पुढच्या वर्षात भारत अमेरिकेतील ‘सीईओ डायलॉग’ नव्याने सुरू होणार आहे. याबरोबरच अत्यंत संवेदनशील व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याबाबतची बैठकही २०२३मध्ये पार पडेल. पण हे सारे हिमनगाचे वरचे टोक ठरेल, इतक्या छोट्या गोष्टी आहेत. भारत व अमेरिकेचे सहकार्य २०२३साली याच्याही पलिकडे जाणारे असेल, असा दावा फिनर यांनी केला.

भारत व अमेरिकेचे पुढच्या दशकांमधील सहकार्य कशारितीने पुढे जाईल, याचा निर्णय २०२२ व २३ सालात होईल, असे लक्षवेधी विधान जॉन फिनर यांनी केले. दोन्ही देशांबरोबरील संबंध अतिशय प्रभावशाली ठरतात व अजूनही हे सहकार्य विस्तारण्याची फार मोठी संधी उपलब्ध आहे, असा विश्वास फिनर यांनी व्यक्त केला. तसेच नुकत्याच बालीमध्ये पार पडलेल्या जी२० परिषदेचा दाखला देऊन यातील भारताच्या कामगिरीची अमेरिकेच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारांनी प्रशंसा केली. दरम्यान, या परिषदेत बोलताना भारताने हा काळ युद्धाचा नसल्याचे सांगून राजकीय वाटाघाटींनीच युक्रेनची समस्या सुटेल, असे बजावले होते. याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांनी रशियाला युद्ध रोखण्याची सूचना केली, असा होत असल्याचा दावा अमेरिका व युरोपिय देश करीत आहेत.

भारतावर सतत टीका करणाऱ्या अमेरिकन माध्यमांनी देखील पंतप्रधान मोदी यांची ही विधाने उचलून धरून त्याचा जी२०वर प्रभाव पडल्याचा दावा केला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांनी उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये पार पडलेल्या एससीओच्या बैठकीतही रशियन राष्ट्राध्यक्षांना हा काळ युद्धाचा नसल्याचे सांगून राजनैतिक वाटाघाटीतून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले होते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासूनच भारताने ही भूमिका कायम ठेवलेली आहे. रशियाने देखील भारताची ही भूमिका आपल्या विरोधात नसल्याचे सांगून रशिया त्याचा आदर करीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश पंतप्रधान मोदी यांच्या विधानांचा दाखला देऊन रशियाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दावे ठोकत आहेत. जॉन फिनर यांच्या विधानातूनही तशाच स्वरूपाचे संकेत दिले जात आहेत.

दरम्यान, भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी भारत व अमेरिकेचे संबंध दुतर्फा रस्त्यासारखे असल्याचे सांगून हे संबंध परस्परपूरक असल्याचा दावा केला. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या काळात भारत स्थैर्याचे प्रतीक बनला असून भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित करीत आहे, असे राजदूत संधू पुढे म्हणाले.

leave a reply