वॉशिंग्टन – भारत व अमेरिकेचे द्विपक्षीय सहकार्य केवळ आपल्याच देशांचे हितसंबंध राखण्यापुरते मर्यादित नाही. या लोकशाहीवादी देशांच्या संबंधांचा सकारात्मक प्रभाव साऱ्या जगावर पडतो, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. आपल्या अमेरिका दौऱ्याचा समारोप करीत असताना जयशंकर यांनी अमेरिकेबरोबरील भारताच्या संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य व शांतीसाठी हे सहकार्य अतिशय उपकारक ठरते, याची जाणीव जयशंकर यांनी करून दिली. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व भारताला मिळण्यासाठी सुधारणा घडविण्याचा प्रक्रियेला चालना देण्याची अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच अमेरिकन काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांबरोबरच अमेरिकन उद्योगक्षेत्रातील मान्यवरांशीही जयशंकर यांनी चर्चा केली. यानंतर भारताच्या अमेरिकेबरोबरील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करून हे द्विपक्षीय सहकार्य केवळ एकमेकांचे हितसंबंध राखण्यापुरते संकुचित नसल्याचे सांगून जयशंकर यांनी याचे फार मोठे सकारात्मक परिणाम जगावर होत असल्याचे स्पष्ट केले. आत्ताच्या काळात जगभरातील देश एकमेकांशी घट्टपणे जोडलेले असून एकमेकांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहेत. अशा जगात कुठलाही एक देश समस्या सोडवू शकत नाही, तर देशांच्या आघाड्या यासाठी प्रभावी काम करू शकतात, असे जयशंकर म्हणाले.
अशा परिस्थितीत, भारत व अमेरिका या लोकशाहीवादी देशांच्या सहकार्यामुळे अनेक समस्या सोडविण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, याची जाणीव जयशंकर यांनी करून दिली. तसेच सध्याच्या तणावपूर्ण काळात भारत सेतू म्हणून काम करून जागतिक अर्थव्यवस्थेसमोर खडे ठाकलेले धोके कमी करू शकतो. तसेच राजकीयदृष्ट्या सुरू झालेले जगाचे ध्रुवीकरण देखील रोखू शकतो, ही बाब परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. मात्र यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध स्थान मिळणे आवश्यक ठरते. त्यानंतर भारत आपली ही भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडेल, असे संकेतही आपल्या या दौऱ्यात जयशंकर यांनी दिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शंभराहून अधिक बैठका पार पडल्या. कारण तशी इतर देशांच्या प्रतिनिधींची मागणी होती आणि भारत बड्या देशांवर प्रभाव टाकून आपल्या समस्या दूर करू शकतो, याची जाणीव या देशांना झालेली आहे, असे लक्षवेधी विधान जयशंकर यांनी केले.
भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व मिळायचे असेल तर त्यासाठी सुधारणा घडवाव्या लागतील. ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही, याची भारताला जाणीव आहे. मात्र याचा अर्थ ही प्रक्रिया कधीच सुरू करायची नाही, असा होत नाही, असे सांगून जयशंकर यांनी सदर प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता स्पष्ट शब्दात मांडली.