नवी दिल्ली – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत चीन करीत असलेले दावे निराधार असून चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सुस्पष्ट इशारा भारताने चीनला दिला आहे. या इशाऱ्यापाठोपाठ भारतीय लष्कर आणि वायुसेनेच्या हवाई सुरक्षा यंत्राणा चीनच्या सीमेलगत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सीमाभागात चीनच्या लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सच्या हालचाली पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते. त्याचवेळी चीनने पूर्व लडाखच्या सीमेलगतच्या एका पॅट्रोलिंग पॉईंटजवळ चिनी लष्कराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी पूर्व लडाखमधील चीनच्या लष्करी हालचालींवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘भारताबरोबरचा लष्करी तणाव निकालात काढायचा असेल तर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलणे आवश्यक ठरते, असा चीनचा गैरसमज झाला आहे. पण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केलाच तर यामुळे या क्षेत्रातील शांतता धोक्यात येईल व याच्या गंभीर परिणामांना चीनला सामोरे जावे लागेल’, असा इशारा राजदूत मिस्री यांनी भारतीय वृत्तसंस्थेशी बोलताना दिला. ‘गलवान व्हॅलीमध्ये चिनी लष्कराने केलेल्या कारवाईने चीनने भारताचा विश्वास याआधीच गमावला आहे. त्यामुळे यापुढे भारताबरोबरचे संबंध कोणत्या मार्गाने न्यायचे हे चीनला ठरवावे लागेल’, असेही राजदूत मिस्री यांनी बजावले. तर गलवान व्हॅलीच्या आपल्या भागातील भारतीय सैनिकांची तैनाती आणि हालचाली या पूर्णपणे कायदेशीर असल्याचे सांगून राजदूत मिस्री यांनी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले.
यानंतर भारतीय लष्कराने आणि वायुसेनेने पूर्व लडाखच्या भागांमध्ये आपल्या प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. या यंत्रणा कोणत्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण लढाऊ विमाने आणि ड्रोन्सना क्षणात नष्ट करणारी आकाश ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा लडाखमध्ये हलविल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या हालचाली वाढल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी लडाखच्या सीमेपासून दहा किलोमीटर अंतरावरून उड्डाण केले होते. त्याचबरोबर चीनने लडाखच्या सीमेजवळ बॉम्बर विमाने तैनात केल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, लष्कर आणि वायुसेनेच्या हवाई सुरक्षा यंत्रणांची तैनाती महत्त्वाची मानली जाते. या व्यतिरिक्त भारतीय लष्कराने दौलत बेग ओल्डी आणि पँगॉन्ग त्सो या भागासाठी बारा हजार अतिरिक्त सैनिकांची तैनाती सुरू केली आहे.
दरम्यान, लडाखच्या सीमाभागात चीनकडून सुरू असलेल्या लष्करी हालचालींवर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकेच्या शिकागो शहरातील चिनी दूतावासाबाहेर निदर्शने झाली. तर ब्रिटननेही चीनच्या लष्करी आक्रमकतेवर नाराजी व्यक्त करुन चीनने भारतीय सीमेवरील तणाव कमी करावा, असे म्हटले आहे. तर, लडाखमधील चीनची कारवाई हा व्यापक लष्करी कटाचा भाग असल्याची टीका अमेरिकन सिनेटर टेड योहो यांनी केली आहे.