भारत पाकिस्तानातील आपल्या दूतावासाच्या कर्मचाऱ्यांची कपात करणार

नवी दिल्ली – पाकिस्तानातील भारतीय दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पाकिस्तानी यंत्रणांनी त्यांना मारहाण केल्याचे समोर आले होते. भारताने कडक शब्दात निषेध नोंदविल्यानंतर पाकिस्तानला या दोन भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करावी लागली होती. पण आता भारतीय राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाकिस्तानात होणाऱ्या छळवणकुची गंभीर दखल घेऊन भारत पाकिस्तानी दूतावासातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याचे वृत्त आहे. अशारितीने दुसऱ्या देशातील आपल्या दूतावासातील कर्मचारी मायदेशी बोलावणे याचा अर्थ त्या देशांबरोबरील संबंध बिघडले आहेत, असा होतो.

India-Pakistanकाही दिवसांपूर्वी भारतीय दूतावासाच्या अधिकांऱ्याचा राजधानी इस्लामाबादमध्ये मोटारसायकलस्वारांनी पाठलाग केला होता. याद्वारे भारतीय अधिकांऱ्याना व कर्मचाऱ्यांना घाबरविण्याचे प्रयत्न पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून केले जातात. भारतीय अधिकांऱ्यानी या पाठलागचा व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी भारताने पाकिस्तानला जाब विचारला होता. पण याला काही दिवस उलटत नाही तोच सोमवारी भारतीय दूतावासाचे दोन कर्मचारी बेपत्ता झाल्याची बाब समोर आली होती. भारतीय दूतावासाने तातडीने हालचाली करुन हे कर्मचारी बेपत्ता झाल्याचे परराष्ट्रमंत्रालयाला कळविले. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने या प्रकरणी कडक भूमिका स्वीकारुन पाकिस्तानकडे याची तक्रार नोंदवली होती. म्हणूनच काही तासांनी पाकिस्तानला या कर्मचाऱ्यांची सुटका करणे भाग पडले. भारतीय दूतावासाचे हे दोन कर्मचारी बनावट चलनाच्या प्रकरणात गुंतलेले असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती, अशी सारवासारवी पाकिस्तानने केली आहे. हे भारतीय कर्मचारी काही तास आयएसआयच्या ताब्यात होते व त्यांना मारहाण करण्यात आली, असे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील भारतीय राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास काही दिवसांपासून अधिकच वाढल्याचे दिसत आहे. नवी दिल्लीत पाकिस्तानने राजनैतिक अधिकांऱ्याना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडल्यानंतर भारताने त्याची हकालपट्टी केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तान धडपडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानात कार्यरत असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अशारितीने छळ होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने भारतातील आपल्या उच्चायुक्तांना मायदेशी बोलावून घेतले होते व भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी जाण्याची सूचना केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संवाद झालेला नाही. आता आंतरराष्ट्रीय कायदे व राजशिष्टाचार पायदळी तुडवून पाकिस्तान भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देत असताना भारत पाकिस्तानच्या दूतावासातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या विचारात आहे. यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिकच ताणले जाणार आहे.

leave a reply