कुणीही वक्रदृष्टीने पाहणार नाही इतके सामर्थ्य भारत प्राप्त करील

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

लखनऊ – ‘भारताला कुणावरही आक्रमण करायचे नाही. पण जगातील कुठलाही देश भारतकडे वक्रदृष्टीने पाहणार नाही, इतके सामर्थ्य भारत प्राप्त करील. यासाठीच लखनऊमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात येत आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ब्राह्मोसच्या निर्मितीच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारोह पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग बोलत होते.

कुणीही वक्रदृष्टीने पाहणार नाही इतके सामर्थ्य भारत प्राप्त करील - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगदुसर्‍या देशाची इंचभर भूमीही ताब्यात घेण्याचा भारताचा इतिहास नाही. भारताने कधीही दुसर्‍या देशावर आक्रमण केलेले नाही. पण जगातील दुसरा कुठलाही देश भारताकडे वक्रदृष्टीने पाहणार नाही, इतके सामर्थ्य भारताला प्राप्त करायचे आहे. यासाठी भारताने शस्त्रास्त्रांची देशांतर्गत निर्मिती करण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. हे ध्येय समोर ठेवून ब्रह्मोसच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. रशियाच्या सहकार्याने भारताने ब्राह्मोसची निर्मिती केली असून हे जगातील अतिप्रगत सुपरसॉनिक क्षेपणास्त्र मानले जाते. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेतही ब्राह्मोसच्या विविध आवृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारताकडे असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पाकिस्तानबरोबर चीनलाही धास्ती वाटत असल्याचे उघड झाले होते. मात्र आपल्या ताफ्यातील या क्षेपणास्त्राची संख्या वाढविण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. विशेषतः चीनच्या एलएसीवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे पर्याप्त संख्येने आपल्या ताफ्यात ठेवणे भारतासाठी अत्यावश्यक बनले आहे.

रविवारी पायाभरणी झालेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यातून दरवर्षी १०० ब्राह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील, असा दावा केला जातो. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या दीड महिन्यात दोनशे एकर इतकी जागा उपलब्ध करून देऊन सदर प्रकल्पाला चालना दिली, अशी माहिती यावेळी संरक्षणमंत्र्यांनी दिली.

लखनऊमधील या प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, याने साडेपाच हजार जणांना नोकर्‍या मिळतील. तसेच यासाठी लागणार्‍या सप्लाय चेनमुळे आणखी दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

leave a reply