… तर भारत चीनवर लष्करी कारवाई करील

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा इशारा

नवी दिल्ली – चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत सुरू असलेली राजनैतिक चर्चा अपयशी ठरली, तर भारत लष्करी पर्यायाचा अवलंब करू शकतो, असे जाहीर करून भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनला बजावले आहे. चीनने अजूनही लडाखच्या काही भागातून माघार घेतलेली नसून राजनैतिक वाटाघाटींसाठी वेळ काढून चीन इथे आपली तैनाती वाढवित असल्याचे उघड झाले होते. मात्र चीनच्या या कुटील कारवायांची भारताला पुरती जाणीव आहे व यापुढे चीनला अधिक वेळ देण्यास भारत तयार नसल्याचे संरक्षणदलप्रमुखांच्या इशार्‍यावरून स्पष्ट झाले आहे.

लष्करी कारवाई

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चीनमध्ये अनेकवार चर्चा पार पडली. लष्करी तसेच राजनैतिक स्तरावर पार पडलेल्या या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. अजूनही काही ठिकाणी चीनचे जवान तैनात आहे व इथली तैनाती वाढवून चीनने भारताची मागणी धुडकावल्याचे दिसत आहे. यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पण चीन भारतावर कुरघोडी करण्यासाठी इथली लष्करी तैनाती अधिकाधिक वाढवित आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने मानसरोवरच्या भागात जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची तैनाती केली होती. भारताला चर्चेत गुंतवून लष्करीदृष्ट्या आपली स्थिती अधिक भक्कम करण्याचा चीनचा डाव आहे.

म्हणूनच भारताने याबाबत कडक भूमिका स्वीकारण्याची तयारी केली आहे. तोडीस तोड लष्करी तैनाती करून भारताने चीनला प्रत्युत्तर दिले आहे. यानंतरही चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघार घेण्यास तयार नसेल, तर भारत थेट लष्करी कारवाई करताना कचरणार नाही, असा सुस्पष्ट संदेश जनरल रावत यांच्याद्वारे चीनला देण्यात आलेला आहे. तसे करण्याची धमक भारतामध्ये आहे, त्यामुळे चीनने इथून माघार घेण्यातच या देशाचे हित असल्याचा इशारा भारताकडून दिला जात आहे. जनरल रावत यांच्या या इशार्‍यावर अद्याप चीनकडून अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र चीनची सरकारी माध्यमे नेहमीप्रमाणे भारताला धमक्या देत आहेत.

लष्करी कारवाई

भारतीय लष्कराने चीनला म्यानमार समजण्याची चूक करू नये, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. इतकेच नाही, तर भारत आणि चीनमध्ये लष्करी संघर्ष पेटला तर रशिया भारताच्या नाही तर आमच्या बाजूने उभा राहिल, हे भारताने लक्षात घ्यावे, असे चीनची सरकारी माध्यमे सांगू लागली आहेत. याआधी भारत चीनच्या लष्करी सामर्थ्यासमोर टिकाव धरू शकणार नाही, असे दावे ठोकणारी चीनची माध्यमे आता रशियाचा वापर करून भारताला धमकावू पाहत आहेत, ही बाबच चीनचा आत्मविश्‍वास डळमळल्याचे दाखवून देत आहेत.

भारताचे माजी लष्करी अधिकारी देखील चीन कितीही वल्गना करीत असला तरी लडाखच्या क्षेत्रात भारताला रोखण्याची ताकद या देशाकडे नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. भारत लष्करी कारवाई करू शकतो, याची चीनला समज देणे भागच आहे आणि प्रसंगी भारताने अशा संघर्षाची तयारी ठेवायलाच हवी, त्याखेरीज चीन मागे हटणार नाही, असे या लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. काही मान्यताप्राप्त अभ्यासगटांनीही लडाखच्या क्षेत्रात भारत चीनवर सहज मात करू शकतो, असा निष्कर्ष नोंदविला होता. या क्षणी चीन राजनैतिक तसेच सामरिक पातळीवर एकाकी पडला असून आंतरराष्ट्रीय जनमत चीनच्या विरोधात गेलेले आहे. अशा परिस्थितीत संघर्ष उद्भवला तर भारताला जवळपास सर्वच प्रमुख देशांचा पाठिंबा मिळू शकतो. चीनलाही याची जाणीव झाली असून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची धोरणे चीनला रसातळाला नेणारी असल्याची टीका चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीतील काहीजण करीत आहेत.

यामुळे भारताबरोबर संघर्ष उद्भवला तर दुसर्‍या देशांचा पाठिंबा मिळणे दूरच राहिले, चीनच्या राजवटीला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागेल, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. अशा काळात भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिलेला हा इशारा चीनवरील दडपण अधिकच वाढविणारा ठरत आहे.

leave a reply