भारतीय नौदल टॉर्पेडोभेदी ‘मारीच’ने सज्ज होणार

नवी दिल्ली – भारतीय युद्धनौका किंवा पाणबुड्यांच्या दिशेने प्रक्षेपित केलेले टॉर्पेडो हुडकून काढून त्यांना नष्ट करणार्‍या ‘मारीच’ यंत्रणेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ने (डीआरडीओ) विकसित केलेली ही यंत्रणा भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या सागरी क्षेत्रातील चिनी पाणबुड्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर मारीच यंत्रणेचा भारतीय नौदलातील समावेश औचित्यपूर्ण ठरतो.

भारतीय नौदल, ‘मारीच’

भारतीय नौदल आणि ‘डीआरडीओ’ने विकसित केलेली मारीच ही टॉर्पेडोभेदी यंत्रणा पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. भारतीय युद्धनौकांना निर्माण झालेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर २०१६ सालापासून ‘डीआरडीओ’ सदर यंत्रणेवर काम करीत आहे. वर्षभरापूर्वी सदर यंत्रणेची निर्मिती पूर्ण झाली असून गेल्या काही महिन्यांपासून नौदलाच्या विनाशिकांवरून तसेच सागरी प्लॅटफॉर्मवरून मारीच यंत्रणेची चाचणी घेण्यात येत होती. या चाचण्यांमध्ये भारतीय नौदलाच्या नियोजित निकषांवर सदर यंत्रणा यशस्वी ठरल्याचे नौदलाने जाहीर केले.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या यंत्रणेमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचा दावा नौदलाने केला आहे. ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीकडे सदर यंत्रणेच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय नौदलातील प्रत्येक विनाशिका मारीच यंत्रणेने सज्ज केली जाणार असून यामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेत वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंगालच्या उपसागरापासून हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी पाणबुड्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, मारीच यंत्रणेची तैनाती महत्त्वाची ठरते.

या महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय नौदलाने हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या वाढत्या हालचालींची माहिती प्रसिद्ध केली होती. मलाक्काच्या आखातापासून ते एडनच्या आखातापर्यंत चिनी पाणबुड्यांच्या वाढत्या हालचालीची नोंद भारतीय नौदलाने घेतली होती. पारंपारिक क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या पाणबुड्यांपासून ते आण्विक क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या चिनी पाणबुड्या हिंदी महासागर क्षेत्रातून वावरत असल्याची नोंद भारतीय नौदलाने केली होती. आण्विक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या पाणबुड्या रवाना करून चीन भारताला आव्हान देत असल्याचा इशारा भारतीय नौदलाने दिला होता.

याव्यतिरिक्त गेल्या डिसेंबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या सागरी ड्रोन्सच्या ३४०० हून अधिक हालचाली टिपण्यात आल्या आहेत. सागरी तळाचा अभ्यास करण्यासाठी आपण या ड्रोन्सचा वापर करीत असल्याचे चीनच्या नौदलाचे म्हणणे आहे. पण हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचाली आपल्या सागरी सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे भारतीय नौदलाने याआधीच बजावले होते. या पार्श्वभूमीवर मारीच यंत्रणेचा भारतीय नौदलातील समावेश चीनसाठी इशाराघंटा ठरते.

leave a reply