‘एससीओ’च्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांचा चीन व पाकिस्तानला संदेश

नवी दिल्ली – ‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) २० व्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. गलवानच्या संघर्षानंतर लडाखच्या ‘एलएसी’वरील भारत-चीन सीमावाद चिघळलेला असताना, ‘एससीओ’च्या या व्हर्च्युअल बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले. मात्र द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा टाळायची या ‘एससीओ’च्या संकेतानुसार पंतप्रधान मोदी यांनी या चौकटीत राहूनच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडेबोल सुनावले.

चीन व पाकिस्तान

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांद्वारे दोन देशांमधील कनेक्टिव्हिटी वाढवित असताना, परस्परांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर राखणे अनिवार्य ठरते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याद्वारे लडाखच्या ‘एलएसी’चे उल्लंघन करू पाहणार्‍या चीनला भारताच्या पंतप्रधानांनी योग्य तो संदेश दिल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करुन पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा थेट नामोल्लेख न करता टोला लगावला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार झाल्याखेरीज ही संघटना अपूर्ण असेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचा पुरस्कार केला. ‘एससीओ’च्या या व्हर्च्युअल परिषदेवर भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणावाचे सावट पडले असले तरी, द्विपक्षीय मुद्दे इथे थेटपणे उपस्थित न करण्याचा संयम भारताच्या पंतप्रधानांनी दाखविला. त्याचवेळी चीन व पाकिस्तानसारख्या शेजारी देशांना आवश्यक तो खरमरीत संदेश देण्याची संधीही भारताच्या पंतप्रधानांनी साधली. याबरोबरच कोव्हिड प्रतिबंधक लसीची निर्मिती झाल्यास, भारत आपली सारी संसाधने वापरुन व्यापक प्रमाणात या लसीचे उत्पादन करील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी ‘एससीओ’ला दिली आहे.

leave a reply