चीनच्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान शहीद

चकमकीत चीनचे ४३ जवान ठार

नवी दिल्‍ली/ लेह – १९६२ साली बेसावध भारताच्‍या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनने यावेळीही विश्वासघात करून चढविलेल्या हल्‍ल्‍यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. लडाखच्‍या गलवान व्‍हॅलीमधून माघारीचे नाटक करणाऱ्या चिनी जवानांनी सोमवारच्‍या मध्यरात्री २ वाजता लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडफेकिचा हल्‍ला चढविला. यात कर्नल संतोष बाबू, हवालदार पलानी आणि शिपाही कुंदन झा शहिद झाले आणि या झटापटीत प्राणघातक जखमा झालेल्या आणखी १७ जवानांना वीरगती प्राप्‍त झाली. दोनही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकऱ्यांमध्ये झालेल्‍या चर्चेनुसार चिनचे जवान गलवान व्‍हॅलीतून माघार घेत होते. पण याच क्षणी चिनी जवानांनी भारतीय सैनिकांवर हा हल्‍ला चढविला. सावध झालेल्‍या भारतीय सैनिकांनी चिनी जवानांवर प्रतिहल्‍ला चढविला पण या वेळी भारतीय सैनिकांचे संख्याबळ कमी होते. मात्र कुमक आल्‍यानंतर परिस्‍थिती बदलली आणि या संघर्षात चिनचे तब्‍बल ४३ जवान ठार झाले.

चीनने या चकमकीचे खापर भारतावर फोडले आहे. भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत शिरले आणि यानंतर झालेल्या संघर्षात चीनचे ५ जवान ठार तर ११ जवान जखमी झाल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे तसेच सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी संयम दाखवण्याची गरज असल्याची चिथावणीखोर मागणी चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने केली आहे. तर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने यावर संयमी प्रतिक्रिया दिली असून चीन सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत असल्यानेच हा संघर्ष पेटल्याचे बजावले आहे. मंगळवारी चीनबरोबर या संघर्षानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख ॲडमिरल करमवीर सिंग आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. भदोरीया यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्र्यांनी सदर संघर्षाची विस्तृत माहिती दिली. २० भारतीय सैनिकांना शाहिद करणाऱ्या विश्वासघातकी चीनच्या विरोधात भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारताचा पुन्हा एकदा विश्वासघात करणाऱ्या चीनला प्रत्युत्तर द्यायलाच हवे अशी उस्फुर्त मागणी भारतीय जनतेकडून केली जात आहे. सोशल मीडियावरून याचे प्रतिबिंब उमटले.

चिनच्‍या लष्कराने लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडांनी भारतीय सैनिकांवर हल्‍ला चढविला. अशा रितीने जगातले कुठलेही सैन्य लढत नाही. कर्नलच्या हुद्दयावरील अधिकाऱ्यासह २० सैनिक शहिद झाल्‍यानंतर आता भारताने चीनच्‍या हल्‍ल्‍याला गोळीने प्रतिउत्तर देण्याची गरज आहे, असे माजी लष्करी अधिकारी सुचवित आहेत. भारताच्‍या २० जवानांना विरगती प्राप्‍त झाली तर चिनचे ४३ जवान ठार झाले. यामुळे भारतीय लष्कराचे मनोबल अतिशय उंचावले आहे. आता चिनला भारताच्‍या शर्तीवर माघार घ्यावीच लागेल असा दावाही माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुढच्‍या काळात या हल्‍ल्‍याचे फार मोठे परिणाम चीनला भागावे लागतील. असा इशारा सामारिक विश्लेषक देत आहेत. त्‍याचवेळी सिमेवरील परिस्‍थिती अधिक चिघळू नये यासाठी उभय देशांच्‍या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाल्‍याच्या बातम्‍या आल्‍या होत्‍या.

गलवान व्हॅलीच्या क्षेत्रात हेलिकॉप्टर पाठवून चीनने आपल्या जवानांचे मृतदेह परत नेल्याचे वृत्त आहे. मात्र अधिकृत पातळीवर चीनने या संघर्षात ठार झालेल्या आपल्या जवानांबाबतची संपुर्ण माहिती दिलेली नाही. याबाबतची अधिक माहिती चीनकडून उघड केली जाण्याची शक्यताही नाही. अचानकपणे चढविलेल्या या हल्ल्यामागे कोणते डावपेच असावेत याची चर्चा भारतीय विश्लेषक करू लागले आहेत. लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी दिलेले प्रत्युत्तर चीनला अनपेक्षित होते तसेच लदाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या चीन लगतच्या सर्वच सीमेवर भारतीय लष्कर आणि वायुसेनेने चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेली जैय्यत तयारी चीनला अस्वस्थ करणारी ठरली. लडाखच्या दौलत बेग ओल्‍डी तळावरील नव्या धावपट्ट्या तसेच सीमाभागात भारत करीत असलेला पायाभूत सुविधांचा विकास चीनला खुपतो आहे. भारत लवकर पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांनी पाकिस्तान बरोबर चिनचीही झोप उडाली आहे. यामुळे सिपीईसी प्रकल्पातील आपली अब्जावधीची गुंतवणूक व अक्साई चीनवरील ताबा धोक्यात आल्याचे चीनला वाटत आहे.

या पार्श्वभूमीवर भारताला अद्दल घडविण्याच्‍या इराद्याने चीनने हा आकस्‍मिक हल्‍ला चढविला. सध्या चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून राजधानी बिजिंगसह आठ प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनावर विजय मिळवण्याचे दावे ठोकणाऱ्या चिनसाठी हि नामुष्कीची बात ठरते. त्‍याचवेळी या साथीला जबाबदार असलेल्‍या चीनच्‍या विरोधात जगभरात कमालीचा असंतोष आहे. हाँगकाँगमधील निदर्शकांवर कारवाई, तैवानच्‍या स्‍वातंत्र्याचा मुद्दा आणि साऊथ चायना सी मधील चिथावणीखोर कारवाया करणाऱ्या चीनविरोधात आंतरराष्ट्रीय जनमत तापलेले आहे. चिनची जनताही कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या एकाधिकारशाही, जुलमी व्‍यवस्‍था, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासर्वांना विटलेली आहे. कधी नाही ते चिनमध्ये अंतर्गत राजकीय संघर्ष वाढू लागला असून राष्‍ट्राध्यक्ष जिंग पिंग या साऱ्यांमध्ये घेरले गेले आहेत. अमेरिकेच्‍या तिन विमानवाहू युद्धनौका चीनच्‍या प्रभावक्षेत्रात शिरून या देशाला आवाहन देत आहेत. अशा परिस्‍थितीत जगाचे व चिनी जनतेचेही लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चीनने भारताबरोबरील सिमेवर तणाव वाढविण्याची जोखिम पत्‍करल्‍याचे दिसत आहे,

पण चीनचा हा डाव या देशाच्‍या अंगावर उलटणार असल्‍याचे स्‍पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे भारताची चीनबाबतची भूमिका आक्रमक बनेल व भारताची निर्णय प्रक्रियाही अधिक गतीमान बनेल. उत्तर कोरिया आणि पाकिस्‍तान या देशांचा अपवाद वगळता इतर कुठल्‍याही देशांचे सहकार्य नसलेल्‍या चीनच्‍या विराेधात खडी ठाकत असलेली राजकीय, आर्थिक व सामरिक आघाडी यामुळे अधिकच भक्कम होऊन त्‍याला तोंड देणे चिनसाठी अवघड बनत जाणार आहे. त्‍यामुळे भारताबाबत घेतलेला हा निर्णय चीनसाठी आत्‍मघाती ठरू शकेल. चीनलाही काही प्रमाणात याची जाणीव आहे व म्‍हणूनच चीनने भारतीय सैनिकांवर गोळीबार न करता सळ्या व काठ्यांचे प्रहार व दगडफेक याचा वापर केला. या ठिकाणी थेट लष्करी आघाडी उघडण्याची धमक चीन दाखवू शकेलेला नाही. ही बाब आजच्‍या भारताचे सामर्थ्य व चीनची मर्यादा स्‍पष्ट करणारी बाब असल्‍याचे दिसत आहे.

leave a reply