इस्लामाबाद – इम्रान खान ज्या पद्धतीने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय व लष्कराला टार्गेट करीत आहेत, ते पाहून भारतीय खूश झाले आहेत. दुश्मन देश असलेल्या भारताला आणखी काय हवे? असे दावे ठोकून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात भारताला खेचले आहे. इम्रान खान पाकिस्तान अस्थिर करीत असून ही बाब भारतासाठी उपकारक ठरते. म्हणूनच भारतीय माध्यमे पाकिस्तानातील या घडामोडींना व इम्रान खान यांना विशेष महत्त्व देत असल्याचे आरोप याआधीही पाकिस्तानच्या सरकारमधील काही नेत्यांनी केले होते.
गुरुवारी लाँग मार्च दरम्यान इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इम्रान खान यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखणाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंतप्रधान शाहबाज शरीफ व अंतर्गत सुरक्षामंत्री राणा सनाउल्लाह व आयएसआयच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे ठपका इम्रान खान यांनी ठेवला होता. यानंतर देशात शांततेने क्रांती होईल की खूनी क्रांती, ते आता पाकिस्तानी लष्कराने ठरवावे, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली होती. अर्थातच भारतीय माध्यमांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ला व त्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांना विशेष महत्त्व दिले होते.
इम्रान खान यांच्या लाँग मार्चमुळे पाकिस्तानात अराजक माजण्याची शक्यता असून हा देश आपले अस्तित्त्व गमावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. याला इम्रान खान व पाकिस्तानच्या लष्करामधील संघर्ष कारणीभूत असेल, असे दावे भारतीय विश्लेषकांनी केले होते. भारताने अब्जावधी डॉलर्स खर्च करूनही पाकिस्तानची जनता या देशाच्या लष्कराविरोधात गेली नसती. ते महान कार्य इम्रान खान यांनी एकहाती करून दाखविले, हे भारतीय विश्लेषक प्रांजळपणे मान्य करीत आहेत. याचे इम्रान खान यांना भारतीय विश्लेषक व माध्यमांकडून दिले जाणारे श्रेय हा देखील भारताच्या पाकिस्तानविरोधी धोरणांचा भाग असल्याचे दावे पाकिस्तानातून केले जातात.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान भारताला हवे तेच करीत असल्याचे आरोप करून भारताचा उल्लेख ‘दुश्मन देश’ असा केला. तसेच भारतीय पाकिस्तानातील परिस्थिती पाहून हसत आहेत आणि याला इम्रान खान जबाबदार असल्याची टीका शाहबाज शरीफ यांनी केली. याआधी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी भारतीय माध्यमांकडून मिळणारे महत्त्व इम्रान खान यांनी एन्जॉय करावे, असा टोला मारला होता. तर पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी इम्रान खान लष्कर व आयएसआयवर करीत असलेले आरोप भारताकडून उचलून धरले जात आहेत, असा ठपका ठेवला होता. त्यामुळे आपल्या देशातील राजकीय संघर्षात भारताचा वापर करण्याची तयारी पाकिस्तानच्या सरकारने केली असून याद्वारे इम्रान खान यांना जेरीस आणण्याचे डावपेच या सरकारने केल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानातले काही विश्लेषक तर आपल्या देशातील या अराजकाच्या मागे भारताचे कारस्थान असल्याचे जाहीर आरोप करीत आहेत. मात्र इम्रान खान यांना पाकिस्तानच्याच लष्कराने सत्तेवर आणले होते आणि लष्कराशी मतभेद झाल्यामुळेच इम्रान खान यांना पंतप्रधानपद सोडावे लागले, ही बाब हे विश्लेषक लक्षात घ्यायला तयार नाहीत.
पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआयवर आपण अधिक गंभीर आरोप करू शकतो, पण देशहिताचा विचार करून आपण तसे करण्याचे टाळले आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. पण आत्तापर्यंत त्यांनी केलेले आरोप पाकिस्तानी लष्कर व आयएसआयची बदनामी करण्यासाठी पुरेसे ठरतील, अशी टीका पाकिस्तानच्या सरकारकडून केली जाते. तसेच इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराला टार्गेट करण्याचे धोरण स्वीकारल्याचे भयंकर परिणाम समोर आले असून जनता लष्कराच्या विरोधात निदर्शने करीत असल्याची बाब देखील पाकिस्तानचे काही मंत्री लक्षात आणून देत आहेत.