मुंबई – भारत आत्मविश्वासाने ठासून भरलेला आहे आणि सीमेवरील परिस्थिती हे दाखवून देत आहे, असे सूचक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. लडाखच्या एलएसीवर दहा महिन्यांपासून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी चीनने सैन्यमाघारची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचे व्हिडिओज् प्रसिद्ध होत असताना, पंतप्रधानांच्या या उद्गारांचे महत्त्व वाढले आहे. नॅसकॉमने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशाच्या आत्मविश्वासाचा दाखला देताना सीमेवरील या परिस्थितीचा हवाला दिला.
ज्या काळात प्रत्येक क्षेत्र कोरोनाच्या साथीमुळे प्रभावित झाले होते, त्या काळातही देशाच्या आयटी क्षेत्राने दोन टक्क्यांच्या दराने विकास केला. कोरोनाच्या साथीमुळे घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात असताना, भारताच्या आयटी उद्योगाने आपल्या महसूलात तब्बल चार अब्ज डॉलर्सची वाढ केली. ही अतिशय प्रशंसनीय बाब ठरते. साथीच्या काळात लाखोजणांसाठी नवे रोजगार उपलब्ध करून देऊन देशाच्या आयटीक्षेत्राने आपण भारताच्या विकासासाठीचे भक्कम आधारस्तंभ आहोत, हे सिद्ध केले, अशा शब्दात पंतप्रधानांनी या क्षेत्राचे कौतुक केले. त्याचवेळी या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आयटी क्षेत्रासाठी सरकारने स्वीकारलेल्या धोरणांचे स्वागत होत आहे. आधीच्या काळात मॅप्स तसेच जिओस्पेशल डेटा मुक्त करताना ‘रेड लाईट’ दाखविली जायची. याचा सुरक्षेवर परिणाम होईल, असे इशारे दिले जात होते. पण सरकारने मॅप्स व जिओस्पेशल डेटा मुक्त करण्याचा निर्णय घेतला. याचा आयटी क्षेत्राला फार मोठा लाभ मिळत आहे. यामुळे सुरक्षेला असलेल्या धोक्याचा सामना करण्याचा आत्मविश्वास व क्षमता आजच्या भारताकडे आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. म्हणूनच हा निर्णय देशाच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा परिचय करून देत आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
बंधनांमध्ये देशाचे भविष्य विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच सरकार तंत्रज्ञान क्षेत्रातील अनावश्यक नियम रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.
आत्ताच्या काळात सार्या जगात भारताची तंत्रज्ञान त्रेज्ञात देशाची जी काही ओळख आहे, ती पाहता देशाला आयटी क्षेत्राकडून फार मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आपले तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात ‘मेड इन इंडिया’ आहे हे देखील आयटी क्षेत्राने सुनिश्चित केले आहे. पण पुढच्या काळात आपल्या सोल्युशन्समध्ये देखील ‘मेक फॉर इंडिया’ची छाप पडावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
भारताला जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घ्यायची असेल, तर त्यासाठी संशोधन व संस्थागत विकासाची आवश्यकता भासेल. संस्थागत उभारणीकडे देशाच्या आयटी क्षेत्राला विशेष लक्ष पुरवावे लागेल, असा संदेशही यावेळी पंतप्रधानांनी दिला.