नवी दिल्ली – आपल्या सीमेजवळील भागात चीन करीत असलेल्या बांधकामावर भारताची करडी नजर रोखलेली आहे. देशाची सुरक्षा व सार्वभौमत्त्व याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू आहे, अशी ग्वाही परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी संसदेत दिली. यासंदर्भात लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुरलीधरन यांनी ही ग्वाही दिली.
लडाखच्या एलएसीवरील पँगॉंग सरोवर क्षेत्राजवळून चीनच्या लष्कराने माघार घेतली खरी. पण अजूनही लडाखच्या एलएसीजवळील आपले लष्कर चीनने पूर्णपणे माघारी घेतलेले नाही. भारतीय सैन्य चीनच्या लष्कराकडे सावधपणे पाहत आहे. लवकरच लडाखच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशांमधील चर्चेची नवी फेरी सुरू होईल. याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, चीनने आपल्या तिबेट व झिंजियांग प्रांताच्या भारताजवळील भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केल्याचे समोर येत आहे. या बांधकामाचा वेग आणि व्याप्ती भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारी असल्याचे सांगितले जाते.
मात्र भारत या आघाडीवर अतिशय सावध असल्याचे सांगून चीनच्या या हालचालींवर भारताची करडी नजर रोखलेली आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्पष्ट केले. तसेच इथल्या सीमाभागात रस्ते तसेच पूल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती व्ही. मुरलीधरन यांनी दिली. चीन भारताच्या एलएसीजवळ बांधकाम करीत असताना, आपल्या क्षेत्रात पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्प राबवून भारत त्याला सडेतोड उत्तर देत असल्याची जाणीव परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी करून दिली. या विकासप्रकल्पांद्वारे इथल्या अर्थकारणाला चालना दिली जात असल्याचे सांगून व्ही. मुरलीधरन यांनी भारत या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज बनत असल्याचे स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळ चीन गावांची उभारणी करीत असल्याचे समोर आले होते. सरकारला याची जाणीव असून चीनच्या हालचाली गंभीर्याने घेतल्या जात असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती.