युद्धकाळातील सज्जतेसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान अत्यावश्यक

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञाननवी दिल्ली -‘युद्धाच्या काळात भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान सहजगत्या उपलब्ध होऊन त्याचा वापर पूर्ण क्षमतेने करता येऊ शकतो. संघर्षाच्या काळात परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याचे टाळणे ही अत्यावश्यक बाब ठरते’, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी बजावले आहे. यावेळी जनरल नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून युद्धसज्जतेसाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात येत आहे, याकडेही लक्ष वेधले.

भारतीय लष्कर व उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘फिक्की’ या संस्थेने सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लष्करप्रमुख नरवणे यांनी स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. युद्धाच्या काळात तंत्रज्ञानासाठी भारताला दुसर्‍या देशावर विसंबून राहता येणार नाही, ही बाब लक्षात आणून देऊन जनरल नरवणे यांनी देशी तंत्रज्ञानाचा वापर अधिक विश्‍वासार्ह व प्रभावी ठरेल, असा दावा केला.

भारताच्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत आहे. पुढच्या काळा देशी बनावटीची शस्त्रास्त्रे आणि संरक्षणविषयक यंत्रणा याबाबतच्या मागण्या भारतीय उद्योगक्षेत्राकडून पूर्ण केल्या जाऊ शकतात, असा विश्‍वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला. यासाठी लष्कर पुढाकार घेणार आहे, असे जनरल नरवणे पुढे म्हणाले. देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगक्षेत्र तसेच स्टार्टअप्स् भारतीय लष्कराच्या उपक्रमांमध्ये अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतात. कारण भारतीय लष्करासाठी लागणार्‍या साहित्याची किंमत तुलनात्मकदृष्ट्या कमी असते, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.

आत्मनिर्भर भारत योजनेमुळे देशातील उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली चालना मिळाली, असे सांगून जनरल नरवणे यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. दरम्यान, लष्कराचे लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल यांनी भारतीय लष्करासाठी आवश्यक असलेल्या देशी बनावटीच्या संरक्षणविषयक यंत्रणा व शस्त्रास्त्रांसाठी दर्जा व किंमत हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतील, असे फिक्कीच्या या कार्यक्रमात स्पष्ट केले.

leave a reply