भारत-अमेरिकेचे संबंध कधीही नव्हते इतके दृढ बनले आहेत

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिकेचे संबंध पूर्वी कधीही नव्हते इतके दृढ बनलेले आहेत, असे सांगून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे. तर अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी चीनबरोबरील सीमावादात अमेरिका भारताच्या मागे ठामपणे उभी असल्याचे सांगून यासाठी भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्यास सज्ज असल्याची घोषणा केली. या दरम्यान, अमेरिका भारतीय नौदलासाठी लांब पल्ल्याच्या तोफा पुरविण्यास तयार झाल्याच्याही बातम्या येत आहेत. चीनच्या आक्रमकतेत वाढ होत असताना, अमेरिकेकडून दिल्या जाणार्‍या या संदेशांना सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘जसे हे जग आहे, तसेच त्याकडे पाहण्याचा भारत व अमेरिकेचा प्रयत्न आहे. दोन्ही देश एकमेकांकडे त्याच दृष्टीने पाहत आहेत. महान लोकशाही, जागतिक सत्ता आणि मित्र म्हणून भारत व अमेरिका परस्परांकडे पाहत असून दोन्ही देशांमधील सहकार्य केवळ उभय देशांच्याच नाही तर हे क्षेत्र व सार्‍या जगाच्या भल्याचे ठरते’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी २०१९ सालच्या जून महिन्यात भारताला दिलेल्या भेटीत म्हटले होते. त्याचीच त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. तसेच पूर्वी कधीही नव्हते, इतके भारत व अमेरिकेचे संबंध दृढ झाले आहेत. व्यापारापासून ते लष्करी सहकार्याच्याही पलिकडे हे संबंध गेले आहेत, असा दावा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला.

भारत व अमेरिकेमधील संबंधांना गती देण्यासाठी भारताच्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फार मोठे योगदान दिले, असे सांगून माईक पॉम्पिओ यांनी त्यासाठी जयशंकर यांची प्रशंसा केली. तर अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताबरोबरील सहकार्याला असाधारण स्थान असल्याचा निर्वाळा दिला. विशेषतः लडाखच्या एलएसीवर सुरू असलेल्या चीनच्या कारवाया चिंताजनक असल्याचा उल्लेख करून अमेरिकेच्या राजदूतांनी आपला देश भारताच्या मागे ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान हे देश क्वाडची स्थापना करून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत आहेत, याचा अस्पष्टसा संदर्भ यावेळी जस्टर यांनी दिला.

‘सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रात येणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या सहकार्याची पायाभरणी सुरू झालेली आहे. पुढच्या पाच वर्षाच्या काळात हे सहकार्य अधिकाधिक भक्कम करणे व या क्षेत्रातील मर्यादारेषा सुस्पष्टपणे आखणे हे आपले ध्येय असले पाहिजे’, असे अमेरिकेच्या राजदूतांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका आपले संरक्षणविषयक सहकार्य जाणीवपूर्वक विकसित करीत असून याद्वारे केवळ आपल्याच नाही, तर इतर देशांच्या सीमा देखील सुरक्षित करण्याचे ध्येय भारत व अमेरिकेसमोर आहे, असा दावा राजदूत केनेथ जस्टर यांनी केला.

‘भारत आणि अमेरिकेसमोर महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर या महान नेत्यांचा आदर्श आहे. पण सर्वच देश अशारितीने विचार करीत नाहीत. काहीजण आत्मघात करणार्‍या मार्गाने पुढे चालले आहेत, तर काही देश लष्करी आक्रमकतेचा पर्याय स्वीकारीत आहेत, असे सूचक शब्दात राजदूत जस्टर यांनी एकाच वेळी चीन तसेच पाकिस्तानला लक्ष्य केल्याचे दिसते. म्हणूनच भारत व अमेरिका आपले संरक्षणविषयक सहकार्य दृढ करीत आहेत, असा दावा राजदूत जस्टर यांनी केला. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अन्यायाचा सामर्थ्य वाढवून मुकाबला करा, या संदेशाचा उल्लेख यावेळी अमेरिकेच्या राजदूतांनी केला.

leave a reply