जपानच्या सेंकाकूजवळ चीनच्या गस्तीनौकांची घुसखोरी

- जपानच्या तटरक्षकदलाचा आरोप

टोकिओ – चीनच्या गस्तीनौकांनी जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहाच्या हद्दीत घुसखोरी करून गस्त घातली. चीनच्या गस्तीनौका किमान 64 तास या भागात होत्या असा आरोप जपानने केला आहे. त्याचबरोबर चीनने वादग्रस्त सागरी हद्दीत नैसर्गिक इंधनवायूचे उत्खनन सुरू केल्याचा ठपकाही जपानने ठेवला आहे.

जपानच्या तटरक्षकदलाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या दोन गस्तीनौकांनी सेंकाकू द्वीपसमुहाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. मंगळवारी सकाळी घुसखोरी केलेल्या या गस्तीनौकांनी गुरुवारी संध्याकाळी या क्षेत्रातून माघार घेतली. चिनी गस्तीनौकांनी या द्वीपसमुहापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरुन प्रवास केल्याचा आरोप जपानने केला. तसेच चिनी गस्तीनौकांची ही घुसखोरी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन असल्याची आठवण जपानने करून दिली.

जपानच्या तटरक्षकदलाने आपली जहाजे रवाना करून चिनी गस्तीजहाजांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. गेल्या दशकभरात चीनच्या जहाजांनी जपानच्या सागरी हद्दीत केलेली ही सर्वात मोठी घुसखोरी ठरते. ‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकू या द्वीपसमुहावर जपानचा प्रशासकीय अधिकार आहे. पण सेंकाकू किंवा चीनमध्ये दियोऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या द्वीपसमुहावर चीन आपला अधिकार सांगत आहे.

गेली कित्येक वर्षे लष्करी आक्रमकतेद्वारे नैसर्गिक खनिजसंपत्तीने समृद्ध या सागरी क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. सेंकाकूप्रमाणे चीनने जपानच्या सागरीहद्दीजवळ इंधनवायूचे उत्खनन सुरू केल्याचा आरोपही होत आहे. चीन बेकायदेशीररित्या हे उत्खनन करीतअसल्याचा ठपका जपानने ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या लढाऊ विमानांनी जपानच्या हवाईहद्दीजवळून धोकादायक उड्डाणे केली होती. चीनच्या या वाढत्या आक्रमकतेची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जपान करीत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे लक्ष युक्रेन युद्धाकडे केंद्रीत झाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या चीनने आपल्या शेजारी देशांविरोधातील आक्रमक हालचाली वाढविल्या आहेत. जपानप्रमाणे तैवानबाबतही चीनने असेच आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

leave a reply