माहितीची सुरक्षा हे राष्ट्रीय सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान

- लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षेच्या समोरील आव्हानांमध्ये माहितीची सुरक्षा हे सध्याचे सर्वात मोठे आव्हान ठरते. या आघाडीवर सुरक्षितता कायम राखतला आली नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसू शकतात व सरकारी यंत्रणेला पांगळे बनविले जाऊ शकते, असा इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील एका महाविद्यायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना लष्करप्रमुखांनी राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची परखड शब्दात जाणीव करून दिली.

माहितीची सुरक्षा

‘इंडियाज् नॅशनल सिक्युरिटी सिनारिओ- पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर’ या विषयावर लष्करप्रमुख बोलत होते. ‘देशाची सुरक्षा ही केवळ संरक्षणदलांपुरती मर्यादित असलेली बाब नाही. याचे सहा महत्त्वाचे स्तंभ आहेत. लष्करी सुरक्षा आर्थिक सुरक्षा, आरोग्यविषयक सुरक्षा, अन्नसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षा, या सार्‍यांचा त्यात समावेश केला जातो. पण आत्ताच्या काळात माहितीची सुरक्षा ही अधिक संवेदनशील बाब बनलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसमोर खडे ठाकलेले हे सर्वात मोठे आव्हान ठरते’, अशा शब्दात लष्करप्रमुखांनी याचे महत्त्व अधोरेखित केले.

सायबर युद्धाचा समावेश अपारंपरिक धोक्यांममध्ये केला जातो. यापासून असलेला धोका केवळ माहितीशी निगडीत असलेली यंत्रणा कोलमडणे इतक्यावर मर्यादित नाही. तर देशाकडील अत्यंत संवेदनशील माहितीच्या चोरीचा धोकाही यामुळे संभवतो. आत्ताच्या काळात सरकार आणि खाजगी उद्योगक्षेत्राची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत मोठा सायबर हल्ला देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हादरा देऊ शकतो आणि याद्वारे सरकारी यंत्रणा पांगळ्या बनविल्या जाऊ शकतात’, असा इशारा लष्करप्रमुखांनी आपल्या व्याख्यानातून दिला.

याबरोबरच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर अचूक हल्ले चढविण्यासाठी केला जातो, याकडेही लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. २०१९ सालच्या सप्टेंबर महिन्यात सौदी अरेबियाच्या इंधन प्रकल्पावर झालेला भीषण हल्ला ड्रोनद्वारे घडवून आणण्यात आला होता. तर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या युद्धातही ड्रोन्सचा वापर झाला. भविष्यातील युद्धात ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल, हे यातून स्पष्ट होते. भारतीय लष्कराला याची जाणीव आहे. या आघाडीवरील लष्कराच्या क्षमतेचे प्रदर्शन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केले जाईल, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या साथीमुळे देशावर कोसळलेले आर्थिक संकट हे देखील देशाच्या सुरक्षेला असलेल्या अपारंपरिक धोक्याच्या श्रेणीत मोडणारी बाब आहे. याबरोबरच हवामान बदल, लोकसंख्या, संसर्गाने होणारे रोग, अमली पदार्थांची तस्करी आणि कट्टरवाद यापासूनही देशाच्या सुरक्षेला धोके असल्याचे नोंद लष्करप्रमुखांनी केली. देशाच्या आर्थिक विकास व पायाभूत सुविधांचा विकासावर लक्ष केंद्रीत करून नागरिकांचा उत्कर्ष साधणे हा देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या कक्षेत येणारा विषय ठरतो, याचीही जाणीव लष्करप्रमुखांनी करून दिली.

आत्मनिर्भर भारताची संकल्पना देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी फार मोठे धोरणात्मक महत्त्व असलेली आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स, मानवरहित यान व विमानांचे तंत्रज्ञान, ५जी, लाँग रेंज प्रिसिजन तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, डायरेक्टेड एनर्जी सिस्टीम्स, यासारखे नवे तंत्रज्ञान स्वीकारून ते आत्मसात करण्याची गरज आहे. म्हणूनच लष्कर आत्मनिर्भर भारतासाठी मोठे योगदान देत आहे. या अभियानात सहभागी व्हायचे की नाही, हा पर्याय आपल्यासमोर राहिलेला नाही, तर ती अनिवार्यता बनलेली आहे, असे लष्करप्रमुख पुढे म्हणाले.

leave a reply