‘आयएनएस विक्रांत’च्या तिसर्‍या टप्प्यातील सागरी चाचण्याही पूर्ण

- लवकरच नौदलात दाखल होणार

‘आयएनएस विक्रांत’नवी दिल्ली/कोची – ‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौकेच्या चाचणींचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ‘आयएनएस विक्रांत’च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आली. ‘आयएनएस विक्रांत’वर बसविण्यात आलेल्या यंत्रणा आणि उपकरणांचे परिक्षण या टप्प्यात घेण्यात आले. त्याचेच विश्‍लेषण केले जात आहे, असे संरक्षणमंत्रालयाने म्हटले आहे. याचवर्षात ‘आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलात दाखल करून घेण्यात येणार आहे. तिसर्‍या टप्प्यातील पूर्ण झालेल्या चाचणीमुळे यादृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

भारताकडे सध्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. ही विमानवाहू युद्धनौका रशियाकडून भारताने घेतली आहे. तसेच तिचे आयुर्मानही खूप जास्त आहे. भारताची सागरी क्षेत्रातील संरक्षणविषयक आव्हाने पाहता भारताला एकावेळी किमान तीन विमानवाहू युद्धनौकांची आवश्यकता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नौदलही यासाठी आग्रही असून यासंदर्भातील मागणी नौदलाने सरकारकडे केली आहे. गेल्याच महिन्यात संरक्षणविषयक संसदीय समितीनेही तीन विमानवाहू युद्धनौकांची मागणी टाळता येणारी नाही असे स्पष्ट केले होते आणि संरक्षण मंत्रालयाला तिसर्‍या विमानवाहू युद्धनौकेची शिफारस केली होती.

मात्र लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकाचवेळी दोन विमानवाहू युद्धनौका असणार आहेत. ‘आयएनएस विक्रांत’च्या रुपात दुसरी विमानवाहु युद्धनौका भारतीय नौदलात ऑगस्टपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे. संपूर्णपणे देशात विकसित केलेल्या या विमानवाहू तंत्रज्ञानाने भारताला अशी क्षमता असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत समाविष्ट केले आहे. ‘आयएनएस विक्रांत’च्या सागरी चाचण्या सुरू होण्यास वेळ लागला असला, तरी आता ज्या वेगाने चाचण्या सुरू आहेत, ते पाहता लवकरच ‘आयएनएस विक्रांत’ नौदलात दाखल होऊ शकते.

ऑगस्टमध्ये ‘आयएनएस विक्रांत’च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात झाली होती. तर पाच महिन्यातच तीन टप्प्यातील चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’च्या सागरी चाचण्या मिळत असलेल्या यशाची पाकिस्तानी माध्यमांमध्येही जोरदार चर्चा आहे. सध्या ‘आयएनएस विक्रांत’ तिसर्‍या टप्प्यातील सागरी चाचण्या पूर्ण करून कोची बंदरात परत आली असून आता या चाचण्यांचे निघालेल्या निष्कर्षांचे विश्‍लेषण केले जाईल. ‘आयएनएस विक्रांत’वर अत्याधुनिक उपकरणे व यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत. त्याची क्षमता तपासणे हा या तिसर्‍या टप्प्यातील सागरी चाचण्यांचा उद्देश होता.

दरम्यान, भारताने ‘आयएनएस विक्रांत’ची उभारणीचा प्रकल्प २००९ साली हाती घेतला होता. तर २०१३ साली ही युद्धनौका बांधून पुर्ण झाली व तिचे जलवातरण झाले. ही विमानावाहू युद्धनौका ४० टन वजनाची असून २६२ मीटर लांब आहे. यावर एकाचवेळी ३० लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सची तैनानी होऊ शकते. या विमानवाहू युद्धनौकेचा भारतीय नौदलातील समावेश भारतीय नौदलाच्या सामर्थ्यांत प्रचंड मोठी वाढ करणार ठरणार आहे. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील सागरी चाचण्या पूर्ण झाल्याचे वृत्त महत्त्वाचे ठरते.

leave a reply