मंडाले – म्यानमारच्या मंडाले भागात स्थानिक जुंटाविरोधी बंडखोरांनी चीनच्या इंधन आणि गॅस पाईपलाईन वर हल्ला चढविला. या हल्ल्यात सदर पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. यानंतर म्यानमारच्या लष्कराने ‘ना विन ताव बो’ या भागात केलेल्या कारवाईत चोवीस जणांना ताब्यात घेतले. गेल्या दोन महिन्यात म्यानमारमधील चीनच्या हितसंबंधांवर झालेला हा तिसरा हल्ला ठरतो. वर्षभरापूर्वी म्यानमारमधील लोकशाहीवादी सरकार उलथून सत्तेचा ताबा घेणार्या जुंटा राजवटीला चीनचे समर्थन आहे. यामुळे संतापलेल्या म्यानमारमधील स्थानिक बंडखोर संघटनांकडून चीनच्या हितसंबंधांना लक्ष्य केले जात आहे.
म्यानमारच्या पीपल्स डिफेन्स फोर्स या जुंटा विरोधी बंडखोर संघटनेने गेल्या आठवड्यात मंडाले भागातील इंधन व गॅस पाईपलाईनवर रायफल ग्रेनेड्सचे हल्ले चढविले. त्याचबरोबर या इंधन पाईपलाईनचे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या म्यानमारच्या लष्करालाही या बंडखोरांनी लक्ष केले. या हल्ल्यात इंधन पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले नसले तरीही या हल्ल्याला भूराजकीय किनार असल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. या हल्ल्याद्वारे स्थानिक जनता आपला चीन विरोध व्यक्त करीत असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. मंडाले भागातून प्रवास करणार्या या दोन इंधन पाईपलाईन चीनने उभारल्या आहेत. म्यानमारच्या किनारपट्टीवरील राखीन प्रांतातून पुढे शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेली ही पाईपलाईन चीनच्या युनान प्रांतापर्यंत जाते. मलाकाच्या आखातातून प्रवास करणार्या इंधनवाहू जहाजांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चीनने म्यानमारमार्गे इंधन व गॅस पाईपलाईन जोडून घेतली आहे. त्यामुळे चीनसाठी ही इंधन व गॅस पाईपलाईन अत्यंत महत्त्वाची मानली जाते, असा दावा माध्यमे करीत आहेत.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या जुंटा राजवटीने अँग सॅन स्यू की यांचे लोकशाहीवादी सरकार उधळून लावल्यानंतर म्यानमारच्या वेगवेगळ्या भागातून प्रवास करणार्या या इंधन आणि गॅस पाईपलाईन वरील हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यांमागे जुंटा राजवटीविरोधात संघर्ष करणार्या वेगवेगळ्या सशस्त्र संघटना आहेत. आपल्या देशातील लोकशाहीवादी सरकार उधळणार्या जुंटा राजवटीला चीनचे समर्थन असल्याचा आरोप या संघटना करीत आहेत. त्यामुळे जुंटा राजवटीसह चीनलाही लक्ष्य करण्यासाठी या वेगवेगळ्या संघटना इंधन व गॅस पाईपलाईनवर हल्ले चढवित आहेत.
म्यानमारमधील लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करीत असलेल्या जुंटा लष्कराला जनतेकडून कडवा विरोध होत आहे. लोकशाहीवादी कार्यकर्ते, बंडखोर संघटना आणि म्यानमारचे नेते प्राण पणाला लावून जुंटा राजवटीला शक्य तितका विरोध करीत आहे. चीनच्या म्यानमारमधील आर्थिक हितसंबंधांना दणका दिल्याखेरीज चीनचा म्यानमारमधील हस्तक्षेप थांबणार नाही. त्यासाठी चीनच्या प्रकल्पांना लक्ष्य करावेच लागेल, असा लोकशाहीवादी तसेच बंडखोर संघटनांचा तर्क आहे. याचे फटके चीनला बसू लागले असून अमानुषपणे बळाचा वापर केल्यानंतरही म्यानमारच्या जुंटा लष्करी राजवटीला हे हल्ले रोखता आलेले नाहीत.