वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय कागदपत्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘लीक’ झाल्याचे उघड झाले आहे. यात अनेक संवेदनशील व महत्त्वाच्या माहितीचा समावेश असून ही घटना राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याचा दावा गुप्तचर तसेच संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी केला. संरक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून अमेरिकेच्या न्याय विभागाने या घटनेची चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येते. रशिया व युक्रेनने या लीकवरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत सदर घटना अपप्रचाराचा भाग असल्याचा दावा केला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला एका सोशल मीडिया ॲपवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी संबंधित काही कागदपत्रे प्रसिद्ध झाली होती. मात्र या घटनेकडे फारसे लक्ष गेले नव्हते. काही दिवसांपूर्वी ‘4चॅन’ नावाच्या ऑनलाईन फोरमवर संरक्षण विभागातील कागदपत्रे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या फोरमवरील लिंक व स्क्रीनशॉटस् टेलिग्राम तसेच ट्विटर या सोशल मीडिया नेटवर्कवर पोस्ट करण्यात आल्या. या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने अमेरिकी माध्यमांसह प्रशासनाने याची दखल घेतली.
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स या दैनिकाने या लीकसंदर्भात पहिले वृत्त प्रसिद्ध केले. त्यात लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये युक्रेन, चीन, इंडो-पॅसिफिक व इराणशी निगडित जवळपास 100 डॉक्युमेंटस्चा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या सर्व डॉक्युमेंटस्वर ती ‘क्लासिफाईड’ असल्याचा उल्लेख आहे. त्याचवेळी यातील काही कागदपत्रे अमेरिकेसह पाच देशांचा गट असलेल्या ‘फाईव्ह आईज्’बरोबर शेअर करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्ये सर्वाधिक कागदपत्रे रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित आहेत. अमेरिका व सहकारी देशांचा युक्रेन युद्धातील सहभाग, तैनाती, युक्रेनी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चा, युक्रेनच्या संभाव्य प्रतिहल्ल्यांशी निगडित मुद्दे, युक्रेनची होणारी हानी, युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्याचे डिटेल्स या गोष्टींचा लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘लीक डॉक्युमेंटस्’चे प्रकरण गंभीर असल्याची कबुली दिली असून अंतर्गत तपास सुरू केल्याचे सांगितले.
संरक्षण विभागाव्यतिरिक्त अमेरिकेच्या न्याय विभागानेही सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कागदपत्रे नक्की कशा रितीने गहाळ झाली, यावर ही चौकशी भर देईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. अमेरिकी दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सदर लीकनंतर संरक्षण विभागात ‘पॅनिक’ची स्थिती निर्माण झाल्याचा दावा केला आहे. कागदपत्रे गहाळ होण्याच्या या प्रकरणाबाबत अमेरिकेच्या सहकारी देशांनीही विचारणा केली असून युरोपिय देशांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटले आहेत.
‘पेंटॅगॉन लीक’च्या प्रकरणावरून रशिया व युक्रेनमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दोन्ही देशांनी सदर प्रकरण अपप्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनकडून रशियाविरोधात हाती घेण्यात येणाऱ्या संभाव्य प्रतिहल्ल्यांपूर्वी गोपनीय कागदपत्रे उघड होणे, ही बाब लक्ष वेधून घेणारी असल्याचा दावा युक्रेनमधील अधिकारी तसेच विश्लेषकांनी केला.
हिंदी