आजच्या इराणकडे शत्रूसमोर शर्ती ठेवण्याची क्षमता आहे

- इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख

तेहरान – ‘याआधी शत्रूदेश इराणसमोर अटी ठेवत होते. पण आजच्या इराणकडे शत्रूसमोर आपल्या शर्ती ठेवण्याची आणि त्या मान्य करून घेण्याची क्षमता आहे’, असा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल हुसेन सलामी यांनी केला. अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या अणुकरारावरील चर्चेबाबत जनरल सलामी यांनी सूचक विधान केल्याचे दिसत आहे. अमेरिकेने इराणवरील सर्व निर्बंध मागे घ्यावे आणि ट्रम्प प्रशासनाने केलेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी द्यावी, अशी मागणी इराणने अमेरिकेकडे केली आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित ‘बसिज’ या लष्करी पथकाला संबोधित करताना जनरल सलामी यांनी इराणच्या क्षमतेत वाढ झाल्याचा दावा केला. ‘याआधी शत्रूदेशांनी वेगवेगळ्या मार्गाने इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, इराणला स्वत:च्या अटींखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. पण त्या परिस्थितीतही इराणनेच बाजी मारली, शत्रूंच्या दबावाखाली इराण झुकला नाही’, असे सलामी म्हणाले. ‘आता तर इराण शत्रूसमोर आपल्या शर्ती ठेवू शकतो आणि त्या पूर्णही करून घेऊ शकतो’, असे सलामी म्हणाले.

त्याचबरोबर इराणकडे अतिप्रगत आणि मुबलक प्रमाणात क्षेपणास्त्र असल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी केला. त्यामुळे याआधी इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याबाबत केलेले दावे पोकळ नव्हते, याची आठवण जनरल सलामी यांनी करून दिली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे इराण आज शस्त्रसज्ज झाला असून त्यांच्या आदेशांनंतरच या क्षेपणास्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा जनरल सलामी यांनी दिला.

रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी या ठिकाणी अमेरिकेचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. पण गेल्या महिन्याभरापासून इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांकडे जनरल सलामी यांनी लक्ष वेधल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इराणला अणुकराराच्या चर्चेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. आपण काहीही न करता अमेरिका अणुकरारात सहभागी होईल, असा समज इराणने करून घेतला असेल, तर ते चुकीचे आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. त्यावर इराणबरोबरील अणुकराराबाबत अमेरिका खरोखरच गंभीर असेल, तर आधी अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घ्यावे व २०१५ सालच्या अणुकराराचे पालन करावे, अशी भूमिका इराणने स्वीकारली. तसेच इराणवर निर्बंध लादणार्‍या ट्रम्प प्रशासनाच्या चुकीची पुनरावृत्ती बायडेन प्रशासन करणार नाही, याची हमी द्यावी, अशी मागणी इराण करीत आहे.

leave a reply